लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून अपप्रचार; मात्र जनतेने त्यांना प्रतिसाद दिला नाही - नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:30 IST2025-07-07T16:27:23+5:302025-07-07T16:30:22+5:30
विरोधकांच्या अपप्रचाराला जनतेने प्रतिसाद दिला नाही, विधानसभा निवडणुकीत त्यांनी याचे उत्तर दिले

लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून अपप्रचार; मात्र जनतेने त्यांना प्रतिसाद दिला नाही - नीलम गोऱ्हे
पुणे: लाडकी बहीण योजनेविषयी विरोधक अपप्रचार करीत आहेत, अफवा पसरवत आहेत. या माध्यमातून राज्यातील महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडली.
शिवसेना शहर संघटक आनंद गोयल यांच्या पुढाकारातून येरवडा, जनतानगर नवी खडकी येथे सुरू करण्यात आलेल्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नागरिकांसाठी छत्री वाटप आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, शहर उपप्रमुख सुनील जाधव, महिला आघाडी संपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, माजी नगरसेविका सुरेखा कदम उपस्थित होत्या.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील भगिनींसाठी 'लाडकी बहीण' योजना सुरू केली. या योजनेमुळे अनेक महिलांना त्यांच्या दैनंदिन खर्चात मोठी मदत मिळत आहे. मात्र, या योजनेवरून विरोधकांनी जाणीवपूर्वक खालच्या थराला जाऊन गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला. परंतु जनतेने त्यांच्या या अपप्रचाराला प्रतिसाद दिला नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांनी याचे उत्तर दिले आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुती व शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा, महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक शुक्रवारी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच महिलांसाठी संगणक, माहिती पुस्तिका आणि अन्य प्रशिक्षण साहित्य खरेदीसाठी माझ्या आमदार निधीतून १० लाखांचा निधी देत आहे. या माध्यमातून अधिकाधिक महिला स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर व्हाव्यात, असे आवाहन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.