विरोधी पक्षाने २० लाख देऊन आमचे उमेदवार फोडले; युगेंद्र पवारांचा अजित पवार गटावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 18:21 IST2025-11-24T18:21:23+5:302025-11-24T18:21:55+5:30
आमचे उमेदवार सर्व सामान्य घरातील असून कष्ट करणारे आणि नोकरी करणारे लोक आहेत, त्यांनी १० वर्षे काम केले तरी त्यांना २० लाख कमवणे शक्य नाही. मात्र, २० ते २५ लाख देऊन आमची माणसे फोडली गेली आहेत.

विरोधी पक्षाने २० लाख देऊन आमचे उमेदवार फोडले; युगेंद्र पवारांचा अजित पवार गटावर निशाणा
बारामती: बारामती नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ८ उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी पक्षाचे नाव न घेता आरोप केला आहे की, पलीकडच्या पक्षाकडून आमचे उमेदवार फोडण्यासाठी प्रत्येकी २०-२० लाख रुपये दिले गेले. त्यामुळे बारामती नगरपालिका निवडणुकीत थंडीतही वातावरण तापले आहे. पक्षाच्या प्रचार शुभारंभाच्या वेळी युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना हा आरोप केला. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिस्पर्धी उमेदवारांना २०-२० लाख रुपये देऊन अर्ज माघारी घेण्यास भाग पाडले.
बिनविरोध झालेल्या आठ जागांपैकी सुमारे चार जागांवर आमचे उमेदवार होते. उमेदवारांवर दबाव आणला जात असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे. प्रत्येक उमेदवाराला २० लाख रुपये दिले गेले असल्याचे सांगितले जात आहे. आमचे उमेदवार सर्व सामान्य घरातील असून कष्ट करणारे आणि नोकरी करणारे लोक आहेत. दहा वर्षे जरी त्यांनी काम केले तरी त्यांना २० लाख रुपये कमवणे शक्य नाही. मात्र, २० ते २५ लाख रुपये सहजपणे देऊन आमची माणसे फोडली गेली आहेत. वीस लाख रुपये म्हणजे काय हे आमच्या उमेदवारांना समजत नाही. आयुष्यभर मेहनत करूनही त्यांना एवढे पैसे कमवता येणार नाहीत. त्यांना पैसे देऊन अर्ज माघारी घेण्यास सांगितले गेले आहे. ते विरोध संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तोपर्यंत आमचे तरुण कार्यकर्ते असतील तोपर्यंत बारामतीमध्ये विरोध संपणार नाही, कारण आम्ही लोकशाहीला मानणारे कार्यकर्ते आहोत. अनेक लोक हे मुद्दाम या कारणासाठी येतात, कारण गेल्या काही वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी पैशांची सवय लावली आहे. पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला आहे. आमचे उमेदवार हे सर्व लहान व्यवसायिक आहेत. आम्ही उच्च शिक्षित आणि सामाजिक कुटुंबातील उमेदवार दिले आहेत. प्रतिस्पर्ध्यांनी दबाव आणला की लोक घाबरतात. आमच्या समोर खूप मोठी शक्ती आहे; आज त्यांच्याकडे सत्ता, पैसा आणि संस्था आहेत. हे सगळे तिथे काम करत असतात. त्यांच्यावर दबाव आणला जात असल्यास दोन-तीन लोक जाणे साहजिक आहे. शेवटी, लहान माणसाला भीती वाटते, जो सामान्य घरातला असतो, तो घाबरून जातो, असे युगेंद्र पवार म्हणाले. बारामती नगरपालिकेत नगरसेवकांना कोणतेही अधिकार नाहीत; त्यांना वरून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे लागते. नगरपालिकेत विविध विषयांवर चर्चा होणे आवश्यक असल्याचेही युगेंद्र पवार यांनी म्हटले.