बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध! भावानेच केला प्रियकराचा भर रस्त्यात खून, पुण्यातील धक्कादायक घटना
By किरण शिंदे | Updated: December 24, 2025 16:11 IST2025-12-24T16:11:42+5:302025-12-24T16:11:54+5:30
दोघांची घरे एकमेकांच्या शेजारी असल्याने अनेक वर्षाची ओळख होती आणि त्यातूनच प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र हे प्रेमसंबंध तरुणीच्या भावाला मान्य नव्हते

बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध! भावानेच केला प्रियकराचा भर रस्त्यात खून, पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे: पुणे शहरात एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध करत भावानेच तिच्या प्रियकराचा निर्घृण खून केलाय. शहरातील आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुदत्त वॉशिंग सेंटर, गायमुख चौक, आंबेगाव परिसरात सोमवारी (२२ डिसेंबर) सायंकाळी हा प्रकार घडला.
जावेद खाजामियां पठाण (वय ३४, सध्या रा. नऱ्हेगाव, मूळ रा. मुदखेड रोड, ख्वाजा नगर, शनी मंदिराजवळ, भोकर, जि. नांदेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी प्रेयसीचा भाऊ संदीप रंगराव भुरके (वय २५, रा. भोकर) याच्यासह आणखी एका आरोपीविरोधात आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत व्यक्तीचा मित्र रौफ उस्मान शेख (वय ३५) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत जावेद पठाण आणि संबंधित तरुणी हे दोघेही नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील रहिवासी होते. दोघांची घरे एकमेकांच्या शेजारी असल्याने अनेक वर्षाची ओळख होती आणि त्यातूनच प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र हे प्रेमसंबंध तरुणीचा भाऊ संदीप भुरके याला मान्य नव्हते.
दरम्यान ११ डिसेंबर रोजी जावेद आणि त्याची प्रेषित घरातून निघून पुण्यात आले आणि नऱ्हे परिसरात एकत्र राहू लागले. बहिण मुस्लिम प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग संदीप भुरकेच्या मनात खदखदत होता. बहिण पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संदीप भुरके एका साथीदारासह पुण्यात आला. जावेद ज्या ठिकाणी राहत होता, त्या ठिकाणी जाऊन त्याने जावेदशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संदीपने धारदार शस्त्राने जावेदवर वार केले. डोक्यावर आणि इतर ठिकाणी गंभीर जखमी झाल्याने जावेद जागीच कोसळला. त्यानंतर आरोपी पळून गेले. गंभीर जखमी अवस्थेत जावेदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ससून रुग्णालय येथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
खून केल्यानंतर आरोपी संदीप भुरके आणि त्याचा साथीदार घटनास्थळावरून फरार झाले. आंबेगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा कसून शोध सुरू आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या टीम रवाना झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिली आहे. प्रेमसंबंधाला विरोधातून घडलेल्या या निर्घृण हत्येमुळे पुणे शहर हादरले असून, या घटनेवरून पुन्हा एकदा ऑनर किलिंगसारख्या घटनेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.