शेतात अफूची झाडे, एकास अटक; ७६ हजार किमतीची झाडे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 15:22 IST2025-03-04T15:21:49+5:302025-03-04T15:22:35+5:30
गावच्या शिवारात स्वत:च्या मालकीच्या शेतात बेकायदेशीर अफूची शेती

शेतात अफूची झाडे, एकास अटक; ७६ हजार किमतीची झाडे जप्त
सुपे : स्वमालकीच्या शेतात अफूच्या झाडांची बेकायदेशीर लागवड केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. राजेंद्र गेनबा कुतवळ (रा. पानसरेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पानसरेवाडी गावच्या शिवारात स्वत:च्या मालकीच्या शेतात बेकायदेशीर अफूची शेती करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सुमारे ७६ हजार किमतीची ८ किलो ४९७ ग्रॅम वजनाच्या अफूच्या बोंडासह झाडे हस्तगत करून पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
अमली पदार्थाचे उत्पादन, साठा, विक्री व सेवन करणाऱ्या इसमांवर कडक कारवाई करण्याचे जिल्ह्यातील वरिष्ठांचे आदेश आहेत. त्यानुसार कुतवळ यांच्याकडे बेकायदेशीर साठा आढळून आल्याने त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले, असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सुप्याचे स.पो.नि. मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जिनेश कोळी अधिक तपास करीत आहेत.