पुणे विमानतळ अलर्ट मोडवर;सुरक्षा व्यवस्था कडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 13:47 IST2025-05-10T13:42:45+5:302025-05-10T13:47:19+5:30

-शुक्रवारी नऊ उड्डाणे रद्द; सीआयएसएफ जवानांच्या सुट्या रद्द

Operation Sindoor Pune airport on alert mode; security arrangements tightened | पुणे विमानतळ अलर्ट मोडवर;सुरक्षा व्यवस्था कडक

पुणे विमानतळ अलर्ट मोडवर;सुरक्षा व्यवस्था कडक

पुणे : पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पुणेविमानतळही अलर्ट मोडवर आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सज्जतेबाबत विमानतळ प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला. यामुळे भविष्यातील दक्षता लक्षात घेऊन पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. सीआयएसएफ जवानांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच बॅगेज तपासणी कडक केल्यामुळे विमान प्रवाशांना वेळेअगोदर येण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या केंद्रांवर एअर स्ट्राइक केला. या स्ट्राइकने संपूर्ण जगाला संदेश देत भारताने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. गुरुवारी पहाटे झालेल्या या कारवाईनंतर दिवसभर देशातील महत्त्वाच्या विमानतळांना अलर्ट करण्यात आले आहे. पुणे विमानतळ सर्वाधिक सुरक्षित आणि महत्त्वाचे विमानतळ आहे. विशेष म्हणजे हे विमानतळ हवाई दलाचे असल्याने सर्वांत महत्त्वाची भूमिका असणार आहे, या पार्श्वभूमीवर गरज भासल्यास पुणे विमानतळाचाही वापर होऊ शकतो. शिवाय प्रवाशांना टर्मिनलमध्ये प्रवेश करताना अनियमित बॅगेज तपासणीला सामोरे जावे लागू शकते. तसेच, इन-लाइन बॅगेज हँडलिंग सिस्टिमअंतर्गत बॅगेज स्कॅनिंगवरही अधिक लक्ष ठेवले जात आहे. तसेच मालवाहतुकीसाठीही अतिरिक्त स्फोटक तपासणी वाढविण्यात आली असून, मालवाहतूक टर्मिनल्सवर देखरेख अधिक कडक करण्यात आली आहे.

 
शुक्रवारी नऊ उड्डाणे रद्द :

‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानमधील काही शहरांवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर देशातील २५ विमानतळांवरील नागरी उड्डाण सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. यामुळे पुणे विमानतळावरून होणाऱ्या काही उड्डाणांवर परिणाम झाला असून, शुक्रवारी विविध मार्गांवरील नऊ विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे विमानतळ प्रशासनाने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार (दि. ९) रोजी नऊ मार्गांवरील इंडिगो, स्पाइसजेट विमानसेवा रद्द करण्यात आली आहे.
 

या ठिकाणच्या विमानसेवा रद्द  

- अमृतसर-पुणे

- चंदीगड-पुणे
- पुणे-चंदीगड

- पुणे-अमृतसर
- नागपूर-पुणे

- पुणे-जोधपूर
- जोधपूर-पुणे

- जयपूर-पुणे
- पुणे-भावनगर
 
विमानतळाची वैशिष्ट्ये :

- हवाई दल विमानाच्या टेक ऑफ, लँडिंग होऊ शकते.
- नाईट लँडिंगची सुविधा असल्याने रात्रभरही विमानतळाचा वापर.
- पाऊस आणि धुक्यातही सुरक्षित लँडिंग, टेकऑफ करण्याची सुविधा.
- चांगले हवामान असणाऱ्या विमानतळांपैकी एक विमानतळ.

Web Title: Operation Sindoor Pune airport on alert mode; security arrangements tightened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.