‘ऑपरेशन सिंदूर’; पुणे विमानतळावरून पाच उड्डाणे रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 19:37 IST2025-05-07T19:35:14+5:302025-05-07T19:37:10+5:30
- प्रवाशांना पूर्ण परतावा व पर्यायी व्यवस्था

‘ऑपरेशन सिंदूर’; पुणे विमानतळावरून पाच उड्डाणे रद्द
- अंबादास गवंडी
पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील काही शहरांवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशातील काही महत्वाच्या विमानतळांवरील नागरी उड्डाण सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम पुणेविमानतळावरून होणाऱ्या काही उड्डाणांवर झाला असून, पाच मार्गांवरील सेवा आज रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे विमानतळ प्रशासनाने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार (दि. ७ ) पाच मार्गावरील विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे अनेक प्रवासी प्रभावित झाले असून, त्यांना याची कल्पना देण्यासाठी विमानतळ प्रशासन, विमान कंपन्या व अन्य संबंधित यंत्रणा तत्पर झाल्या आहेत. प्रवाशांना त्यांच्या बुकिंगनुसार वैयक्तिकरित्या संपर्क साधण्यात आला असून, घोषणावाहिन्यांद्वारे तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही सतत अद्ययावत माहिती दिली जात आहे.
प्रभावित प्रवाशांबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात आले आहे. प्रवाशांना पूर्ण रकमेची परतफेड अथवा अन्य पर्यायी उड्डाणाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. सध्याची स्थिती ही पूर्णपणे संरक्षणविषयक गरजांमुळे उद्भवलेली असून, प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. आम्ही प्रवाशांच्या सोयीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. प्रवाशांनी त्यांच्या तिकीट बुकिंग संबंधित प्रश्नांसाठी थेट संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही विमानतळ प्रशासनाने केले आहे.
रद्द झालेली उड्डाणे :
पुणे - अमृतसर
पुणे - चंदीगड
पुणे - किशनगड
पुणे - राजकोट
पुणे - जोधपूर