आता महिलांसाठीही खुले कारागृह उभारणार: गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 18:32 IST2021-07-17T18:31:52+5:302021-07-17T18:32:37+5:30
येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडील असणार्या जागेवर नवीन कारागृह मुख्यालयाची इमारत बांधणार..

आता महिलांसाठीही खुले कारागृह उभारणार: गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा
पुणे : सध्या पुरुष कैद्यांसाठी खुली कारागृहे आहेत. त्या अनुषंगाने महिलांसाठी खुली कारागृहे निर्माण करण्यात येईल. तसेच कारागृह विभागाचे सध्या मुख्यालय जुन्या मध्यवती इमारतीमध्ये आहे. तेथून हलवून येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडील असणार्या जागेवर नवीन कारागृह मुख्यालयाची इमारत बांधण्यात येईल, यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
कारागृह विभागाचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज येरवडा कारागृहाला भेट दिली. यावेळी अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक सुनिल रामानंद, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, येरवडा कारागृह अधीक्षक यु. टी. पवार आदी उपस्थित होते. कारागृह विभागाचे सादरीकरण सुनिल रामानंद यांनी केले.
यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई येथे बहुमजली कारागृह उभारणे, महिला कैद्यांसाठी खुले कारागृह निर्माण करणे तसेच बंद्यांना न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ट्रायलसाठी हजर करण्यासाठी सीआरपीमध्ये दुरुस्ती करुन जास्तीत जास्त प्रमाणात व्हीसीचा वापर करुन कैद्यांचा वेळ वाचेल. न्याय प्रक्रिया जलद होईल, यासाठी तात्काळ आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले. कारागृह मुख्यालयाच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे सांगितले.