मुलांना चांगल्या गोष्टी शिकवल्या तरच ते उद्याचे सुजाण नागरिक घडतील - मृणाल कुलकर्णी

By श्रीकिशन काळे | Updated: January 28, 2025 16:06 IST2025-01-28T16:01:46+5:302025-01-28T16:06:00+5:30

तंत्रज्ञानाच्या उपयोगाने एका क्लिकवर गोष्टी उपलब्ध होणाऱ्या मुलांना चांगले निवडायला शिकवणे ही पालकांची जबाबदारी

Only if children are taught good things will they become wise citizens of tomorrow - Mrinal Kulkarni | मुलांना चांगल्या गोष्टी शिकवल्या तरच ते उद्याचे सुजाण नागरिक घडतील - मृणाल कुलकर्णी

मुलांना चांगल्या गोष्टी शिकवल्या तरच ते उद्याचे सुजाण नागरिक घडतील - मृणाल कुलकर्णी

पुणे : शाळा, अभ्यास या व्यतिरिक्तच्या वेळात आपण मुलांना काय देतो याकडे लक्ष देणे ही पालकांची जबाबदारी आहे. चांगले शिक्षण, खाणे-पिणे या बरोबरच मुलांना चांगल्या गोष्टींची ओळख करून देणे, चांगले कला प्रकार दाखविणे, चांगल्या लोकांना भेटविणे ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांच्या वाढीच्या वयात पालकांनी त्यांना वेळ देऊन या गोष्टी केल्या तरच ते उद्याचे सुजाण नागरिक घडतील, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ भरत नाट्य मंदिर येथे आयोजिला होता. त्या वेळी मृणाल कुलकर्णी यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, स्पर्धेचे परीक्षक अरुण पटवर्धन, देवेंद्र भिडे आणि संगीता पुराणिक मंचावर होते.

स्पर्धेत राजा नातू करंडक पटकाविणाऱ्या आर्यन्स वर्ल्ड स्कूल भिलारेवाडीच्या ‘गोष्टींची गोष्ट’ आणि नाविन्यपूर्ण व कल्पक सादरीकरणासाठीचा मथुरामाई करंडक मिळालेल्या डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, गणेशनगरच्या ‘गेम ओव्हर’ या एकांकिकांचे सुरुवातीस सादरीकरण झाले.

मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्याने एका क्लिकवर सगळ्या गोष्टी उपलब्ध होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांना चांगले ते निवडायला शिकवणे ही पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. मुलांशी कनेक्ट होणे, त्यांना पुरेसा वेळ देणे हे पालकांपुढे आव्हान आहे.

मुलाला लिखाणाची सक्ती..

मुलगा विराजस याला वाढवताना कोणत्या गोष्टी केल्या, या विषयी मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, विराजस लहान असताना त्याला मी न चुकता रोज मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या 10 ओळी लिहायला लावायचे. ते लिहिल्याशिवाय त्याला जेवण मिळणार नाही असा शिरस्ता पालक म्हणून मी पाळला. त्याचाच परीणाम म्हणजे आता तो उत्तम नाट्यलेखन करू शकतो. याबरोबरच त्याला उत्तमोत्तम वाचायला, पाहायला मिळेल याची काळजीही आम्ही घेतली.

Web Title: Only if children are taught good things will they become wise citizens of tomorrow - Mrinal Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.