रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:31 IST2025-11-13T15:28:01+5:302025-11-13T15:31:34+5:30
Indapur crime news: पहाटे फिरण्यासाठी निघालेल्या लोकांना रस्त्यावर माणसाचा तुटलेला पाय दिसला. लोक हादरले आणि पोलिसांना याची माहिती दिली. पाय पुरूषाचा असल्याचे स्पष्ट झाले, पण ज्याचा पाय मिळाला आहे, तो कुठे आहे आणि तो जिवंत आहे का?

रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
इंदापूर तालुक्यातील कळंब गाव. कळंब-नीमसाखर रस्त्यावरुन लोक पहाटे चालण्यासाठी बाहेर पडले. याच रस्त्यावर एक हॉटेल आहे. या हॉटेलपासून ५०० मीटर अंतरावर गेल्यानंतर लोकांना धक्काच बसला. कारण रस्त्याच्या कडेला पडलेल्या माणसाच्या पायाकडे त्यांचं लक्ष गेलं. सुरूवातीला त्यांना वाटलं एखादा प्राणी मेला असेल, पण जेव्हा जवळ जाऊन बघितले, तेव्हा तो माणसाचा तुटलेला पाय होता. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली आणि खळबळ उडाली. ज्या व्यक्तीचा हा पाय मिळाला आहे, तो कुठे आणि जिवंत आहे का? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
वालचंदनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तुटलेला पाय ताब्यात घेतला. हा पाय पुरुषाचा असून तो डावा पायाचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. तुटलेल्या पायात मोजाही आहे.
या घटनेची इंदापूर तालुक्यात चर्चा सुरू आहे. पोलिसांनी रस्त्यावर आढळून आलेला पाय ताब्यात घेतला असून, त्याची तपासणीही केली जाणार आहे. तुटलेला हा पाय कोणत्या व्यक्तीचा आहे. ती व्यक्ती जिवंत आहे? असे प्रमुख प्रश्न सध्या पोलिसांसमोर असून, त्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पायाचा तुटलेला भाग बुधवारी सकाळी लोकांना दिसला. मॉर्निंग वॉक करत असलेल्या लोकांच्या निर्दशनास हा पाय पडला. त्यांनी पोलिसांना कॉल करून याची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.
पायाचा हा गुडघ्यापासून खालचा भाग आहे. पायाचा भाग तिथे कसा पडला, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पिंजून काढत आहेत. सध्या पोलिसांच्या हाती कोणताही महत्त्वाचा पुरावा लागलेला नाही.