HSRP Number Plate: २६ लाखांपैकी केवळ ५ लाख वाहनांना ‘उच्च सुरक्षा पाटी’; ८ दिवस बाकी असताना पुन्हा मुदतवाढ मिळणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 10:49 IST2025-08-08T10:48:29+5:302025-08-08T10:49:05+5:30
शहरात सध्या २२० फिटमेंट सेंटरची संख्या आहे; परंतु शहरातील वाहनांची संख्या पाहता सेंटरची संख्या अजून वाढविणे गरजेचे आहे

HSRP Number Plate: २६ लाखांपैकी केवळ ५ लाख वाहनांना ‘उच्च सुरक्षा पाटी’; ८ दिवस बाकी असताना पुन्हा मुदतवाढ मिळणार का?
पुणे: परिवहन विभागाने ‘उच्च सुरक्षा नंबर’ पाटीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे; परंतु वाहनधारकांकडून याला म्हणावे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. (दि. ४) ऑगस्टपर्यंत २६ लाख वाहनांपैकी शहरातील केवळ ७ लाख ३७ हजार २१९ वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी अर्ज केले असून, ५ लाख १९ हजार ७६० वाहनांना उच्च सुरक्षा पाटी लावली आहे. त्यामुळे ‘एचएसआरपी’साठी केवळ आठ दिवस बाकी असताना पुन्हा मुदतवाढ मिळणार का? याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून उच्च सुरक्षा पाटी लावण्याचे काम सुरू आहे. पुण्यात एकूण २६ लाख ३३ हजार वाहनांना पाटी लावावी लागणार आहे. आतापर्यंत केवळ ७ लाख ३७ हजार वाहनधारकांनी नोंदणी केली आहे; सुरुवातीला फिटमेंट सेंटरची संख्या कमी होती. त्यानंतर काही प्रमाणात संख्या वाढविण्यात आली आहे. तरीही वाहनधारकांकडून सुरक्षा पाटी लावण्यासाठी दुर्लक्ष होत आहे. शिवाय उच्च सुरक्षा पाटी न लावलेल्या वाहनांची खरेदी-विक्री, वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, बँक कर्ज उतरविणे, वाहन तपासणी प्रमाणपत्र व इतर कामे करू नये, असा आदेश प्रादेशिक परिवहन विभागाला दिला आहे.
वाहनांची संख्या पाहता अजून फिटमेंट सेंटर आवश्यक
रोझमार्टा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आरटीओकडून फिटमेंट सेंटर वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरात सध्या २२० फिटमेंट सेंटरची संख्या आहे; परंतु शहरातील वाहनांची संख्या पाहता सेंटरची संख्या अजून वाढविणे गरजेचे आहे; परंतु याकडे नंबर प्लेट लावणाऱ्या कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.
शहरातील वाहनांची आकडेवारी
शहरातील एकूण वाहने : २६ लाख ३३ हजार
नंबर प्लेटसाठी अर्ज केलेल्यांची संख्या - ७ लाख ३७ हजार २१९
बसविण्यात आलेल्या पाटी - ५ लाख १९ हजार ७६०
जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा पाटी लावण्याकडे दुर्लक्ष होत आहे. १५ ऑगस्टनंतर या वाहनांचे काय करायचे यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. परिवहन मंत्री याबाबत निर्णय घेतील. - शैलेश कामत, परिवहन सहआयुक्त