'एक मराठा लाख मराठा', पुण्यात घरगुती गौरी - गणपतीच्या देखाव्यातून मराठा आरक्षणाला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 13:11 IST2025-09-04T13:10:58+5:302025-09-04T13:11:56+5:30
देखाव्याच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण लाभो असे साकडे गणरायाकडे घालण्यात आल्याचे सुशील चिकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आहे

'एक मराठा लाख मराठा', पुण्यात घरगुती गौरी - गणपतीच्या देखाव्यातून मराठा आरक्षणाला पाठिंबा
धनकवडी : गणेशोत्सवाला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे, अनेक ठिकाणी विविध प्रकारचे आकर्षक देखावे आपल्याला पाहायला मिळतात. या देखाव्यांमधून सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न केला जातो. असाच काहीसा देखावा आंबेगावातील सुशील चिकणे यांनी त्यांच्या गणपती समोर केला आहे. या देखाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मराठा नेते मनोज जरांगे पाटील आहेत. या देखाव्याच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण लाभो असे साकडे गणरायाकडे घालण्यात आल्याचे सुशील चिकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आहे. मराठा समाजासाठी आरक्षण हा अत्यंत ज्वलंत विषय असल्याची प्रचिती या देखाव्यातून येत आहे.
आंबेगाव भागातील लेक विस्टा अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असणारे सुशील चिकणे यांचे मूळ गाव भोर तालुक्यातील भोंगवली असून, ते माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी करतात. मागील चाळीस वर्षांपासून त्यांच्या घरी वडिलांपासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यांनी ही परंपरा आजही जोपासली आहे. यंदाच्या गौरी-गणपती सणासाठी चिकणे परिवार यांनी मराठा आरक्षण हा सामाजिक विषय उभा केला आहे. गणपतीच्या मंडपात त्यांनी समाजातील सध्याच्या ज्वलंत परिस्थितीवर प्रकाश टाकणारा अभिनव देखावा तयार केला आहे.
या देखाव्यात मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी केलेले आंदोलन घराघरात पोहोचेल, अशा पद्धतीने सादर केले आहे. टेबलावर व भिंतीवर पोस्टर्स, छायाचित्रे, बॅनर्स, घोषवाक्य आणि कट-आऊट्सच्या माध्यमातून आंदोलनातील गर्दी, मोर्चा आणि नेत्यांचे फोटो प्रदर्शित केले आहेत. समाजातील एकजूट दाखवण्यासाठी छोट्या गाड्यांचे मॉडेल्स, कट-आऊट्स वापरले आहेत. याशिवाय, गणपती आणि गौरीच्या पारंपरिक पूजे साहित्या सोबत आधुनिक सामाजिक संदेश दिला आहे. फराळ, नैवेद्य, फुले, रंगीबेरंगी रांगोळी आणि सजावटीच्या वस्तूंचा वापर करून धार्मिक व सामाजिक संदेश यथासांग मांडला आहे.