Manoj Jarange Patil: एक मराठा लाख मराठा; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत मराठा बांधवांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 18:48 IST2024-08-11T18:47:47+5:302024-08-11T18:48:38+5:30
मनोज जरांगे पाटील आम्हाला नक्कीच आरक्षण मिळवून देतील, मराठा बांधव - भगिनींचा विश्वास

Manoj Jarange Patil: एक मराठा लाख मराठा; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत मराठा बांधवांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी
पुणे : एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत हजारो मराठा बांधव पुण्यात जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीत सहभागी झाले आहेत. सारसबागेपासून या शांतता रॅलीला सुरुवात झाली असून शहराच्या मध्यवर्ती भागातून म्हणजेच बाजीराव रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे मार्गस्थ झाली आहे. पुण्यातूनही असंख्य मराठा बांधव, महिला या रॅलीत सहभागी झाले आहेत. बाजीराव रस्त्यावर रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्याचे दिसून आले आहे.
आम्ही जरांगेच्या टोप्या घालून, हातात भगवे झेंडे घेऊन हजारो मराठा बांधव या जरांगे यांच्यासोबत असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण बाजीराव रस्त्यावर भगवे वादळ अवतरल्याचे दिसू लागले आहे. आम्ही आरक्षण मिळवणारच, असा निर्धार करून बांधवांनी जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शवला आहे. आम्हाला पाटील नक्कीच आरक्षण मिळवून देतील असा विश्वास मराठा बांधवांनी व्यक्त केला आहे.
कात्रज चौकातून जरांगे पाटलांच्या स्वागताला सुरुवात झाली. चौकाचौकात संघटना, संस्था आणि मंडळांच्या वतीने पाटलांचे फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले. तसेच १५ ते २० फुटांचे हारही त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आले होते. महिलांचा लक्षणीय सहभाग या रॅलीत दिसून आला आहे.जरांगे पाटील आम्हाला नक्कीच आरक्षण मिळवून देतील असा विश्वास महिलांनी व्यक्त केलाय. आमच्या मुलांना शिक्षण पूर्ण होऊनही नोकरी मिळत नाही. ते सध्या बेरोजगार आहेत. आरक्षण मिळाले तर त्यांना नोकरीही मिळेल. यासाठी पाटील लढत आहेत. आम्ही संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांच्यामुळे नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळेल असे महिलांनी सांगितले आहे.