बावधनला वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 20:16 IST2019-09-02T20:13:00+5:302019-09-02T20:16:58+5:30
भरधाव चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले. रविवारी (दि. १) पहाटे बावधन येथे हा अपघात झाला.

बावधनला वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जखमी
पिंपरी : भरधाव चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले. रविवारी (दि. १) पहाटे बावधन येथे हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश साळुंके (रा. खडकमाळ, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, महेश मधुकर काशीद आणि राम (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी बंडू परशुराम काशीद (वय ४३, रा. खडकमाळ, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चारचाकी वाहनचालक रामदास सुखदेव चौगुले (वय २९, रा. थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बंडू काशीद यांचा पुतण्या आकाश हा महेश आणि राम या आपल्या मित्रांना दुचाकीवरून घेऊन जात होता. दरम्यान, ते बावधन येथील एका हॉटेल समोर आले असताना समोरून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये आकाशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर महेश आणि राम गंभीर जखमी झाले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.