पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात एक जण ठार; संतप्त जमावाने पेटवून दिला ट्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 15:57 IST2023-10-24T15:56:08+5:302023-10-24T15:57:17+5:30
या प्रकरणी अपघातास व मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.....

पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात एक जण ठार; संतप्त जमावाने पेटवून दिला ट्रक
इंदापूर : दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेला ट्रक संतप्त ग्रामस्थांनी पेटवून दिल्याची घटना ऐन दस-याच्या दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर गलांडवाडी नं. १ गावच्या हद्दीत घडली. या प्रकरणी अपघातास व मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दशरथ मारुती चोरमले (वय ५५ वर्षे,रा. काळखेवस्ती, गलांडवाडी नं.१,ता.इंदापूर) असे या अपघातात मरण पावलेल्या इसमाचे नाव आहे. त्याचे पुतणे रोहिदास बाळु चोरमले ( रा. काळखेवस्ती,गलांडवाडी नं.१) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
दशरथ मारुती चोरमले हे दूध विक्री करुन आपल्या हिरो होन्डा कंपनीच्या दुचाकीवरुन (क्र. एम आय १४२ सी ५६०४) पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्याने इंदापूरातून आपल्या गावी निघाले असताना गलांडवाडी नं.१ गावच्या हद्दीतील हॉटेल मातोश्रीच्या समोर दुचाकीच्या पाठीमागून भरधाव वेगाने पुण्याकडे चाललेल्या ट्रक (क्र.एमएच ३२ ए जे.९२७३) च्या चालकाने दुचाकीस ठोस दिली. त्यामुळे झालेल्या गंभीर अपघातात दशरथ चोरमले हे जागीच मरण पावले. अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक तेथेच सोडून आरोपी पळून गेला.ही घटना सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी घडली. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी ट्रक पेटवून दिला.