दारू पिऊन झोपला; हाॅटेलमधील खोलीत लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू, सोमवार पेठेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 20:23 IST2025-11-07T20:23:08+5:302025-11-07T20:23:19+5:30
सिगारेटचे जळते थोटूक नशेत असलेल्या व्यक्तीने गादीवर टाकल्याने आग लागली. मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे

दारू पिऊन झोपला; हाॅटेलमधील खोलीत लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू, सोमवार पेठेतील घटना
पुणे : हाॅटेलच्या खोलीत लागलेल्या आगीत एका तरुणाचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. सोमवार पेठेतील एका हाॅटेलमध्ये ही घटना घडली. मोहित भूपेंद्र शहा (३२, रा. दौंड. जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
शहा हा एका सीएकडे काम करत होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्याचा घटस्फोट झाला आहे. शहा याने खूप दारु प्यायल्याने त्याच्या मित्राने त्याला सोमवार पेठेतील एका हाॅटेलमध्ये गुरुवारी रात्री झोपण्यास सांगितले. या हाॅटेलमध्ये खोली त्याने घेतली होती. गुरुवारी रात्री तो तेथे झोपला. शुक्रवारी सकाळी हाॅटेलच्या खोलीचा दरवाजा न उघडल्याने हाॅटेलमधील कामगारांना संशय आला. दुपारी बाराच्या सुमारास खोलीतून मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. हाॅटेलमधील कामगारांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा तो बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याचा आगीची झळ पोहोचल्याने त्याचा पाय भाजला होता. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच तो मरण पावल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अशी माहिती समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा खोलीतील गादी जळाली होती. सिगारेटचे जळते थोटूक नशेत असलेल्या शहा याने गादीवर टाकल्याने आग लागली. मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिस निरीक्षक गित्ते यांनी व्यक्त केली. शवविच्छेदन अहवालात शहा याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.