Pune: वाहनांची संख्या ३९ लाखांवर; पुणेकरांनी आर्थिक वर्षात खरेदी केली ३ लाख वाहने
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 10:22 IST2025-04-02T10:19:20+5:302025-04-02T10:22:40+5:30
पुण्याचे रस्ते मात्र तेवढेच आहेत, परंतु वाहन संख्या वाढल्याने चालवण्यासाठी दिव्य कसरत करावी लागत आहे

Pune: वाहनांची संख्या ३९ लाखांवर; पुणेकरांनी आर्थिक वर्षात खरेदी केली ३ लाख वाहने
पुणे: एकीकडे शहरातील वाहतुकीचा प्रश्न जटिल झालेला असतानाच दुसरीकडे वाहन खरेदीचा धमाका सुरू आहे. दरवर्षी वाहनांच्या विक्रीत झपाट्याने वाढ होत आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात पुण्यात ३ लाख ७ हजार २९९ वाहनांची नोंद पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे झाली असून, पुण्यात यंदा वाहन विक्रीने नवा उच्चांक निर्माण केला आहे. त्यामुळे पुणे शहरात ३९ लाखांपेक्षा जास्त वाहनांची नोंदणी झाली. रस्ते मात्र तेवढेच आहेत. त्यामुळे वाहन चालविण्यासाठी दिव्य कसरत करावी लागते.
वाढत्या वाहनांमुळे शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. पुण्यात नेहमीच वाहन खरेदी जास्त असते. शहरात सध्या ३९ लाखांपेक्षा जास्त वाहने आहेत. त्यामध्ये दुचाकींचे सर्वाधिक प्रमाण आहे. काेरोनापूर्वी प्रत्येक वर्षी वाहन खरेदीत वाढ होत होती. पण सन २०२० मध्ये काेरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर वाहन खरेदीला ब्रेक लागला होता. २०२२ मध्ये काेरोनाचे सर्व निर्बंध उठल्यानंतर वाहन खरेदीने पुन्हा वेग पकडल्याचे दिसून आले आहे.
दुचाकी खरेदीचे प्रमाण वाढले
पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे २०२३-२४ मध्ये दोन लाख ९५ हजार वाहनांची नोंदणी झाली होती. तर २०२४-२५ मध्ये वाहन नोंदणीचा आकडा हा तीन लाखांच्या पुढे गेला आहे. यावर्षी शहरात एक लाख ९४ हजार दुचाकींची खरेदी नागरिकांनी केली आहे. तर ७१ हजार ६०३ जणांनी कार खरेदी केली आहे. गेल्या वर्षात कार खरेदीमध्ये दोन हजारांनी वाढ नोंदली गेली आहे. तर दुचाकी खरेदीमध्ये ११ हजारांनी वाढ झाली आहे. रिक्षा व कॅब खरेदीचा वेग कायम असल्याचे दिसून आले आहे.
ई-वाहन कमी झाले
गेल्या आर्थिक वर्षात १३ हजार ६८९ ई-वाहनांची विक्री झाली आहे. हाच आकडा २०२३-२४ मध्ये ३२ हजार होता. त्यामुळे वाहन खरेदीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. त्यामध्ये ई-बाइक खरेदीचे प्रमाण खूपच घटल्याचे दिसत आहे. २९ हजार ई-बाइक खरेदी होती. यंदा केवळ साडेअकरा हजार ई-बाइक खरेदी करण्यात आल्या आहेत.
सन वाहन खरेदी
२०२३-२४ - दोन लाख ९५ हजार
२०२४-२५ - ३ लाख ७ हजार