रिक्षांची संख्या सव्वा लाख; ट्राफिक कमी करण्यासाठी नव्या रिक्षा परमिटवर निर्बंध हवे, राज्य सरकारला विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:29 IST2025-10-29T12:28:59+5:302025-10-29T12:29:45+5:30
ऑटो रिक्षांचे परवाने खुले केल्याने रिक्षांची संख्या सव्वालाखाच्या वर गेली आहे, ही संख्या वाढल्यास रस्त्यावर रिक्षांची गर्दी वाढून वाहतूक कोंडीत भर पडणार आहे

रिक्षांची संख्या सव्वा लाख; ट्राफिक कमी करण्यासाठी नव्या रिक्षा परमिटवर निर्बंध हवे, राज्य सरकारला विनंती
पुणे : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. पोलिसांसह पालिका करत असलेल्या उपाययोजनांचा चांगला परिणाम दिसत असून, वाहतुकीचा वेग १० टक्क्यांनी वाढला आहे. दरवर्षी चार लाख नव्या खासगी वाहनांची भर पडत आहे. ऑटो रिक्षांचे परवाने खुले केल्याने रिक्षांची संख्या सव्वालाखाच्या वर गेली आहे. नव्या रिक्षा परमिटवर निर्बंध आणणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे त्याबाबतची विनंती राज्य सरकारकडे केली जाणार आहे.
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासंदर्भात महापालिका व पोलिसांची तीन महिन्यांमधील तिसरी संयुक्त बैठक महापालिका भवनात झाली. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, वाहतूक पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव आदी उपस्थित होते. यापूर्वी झालेल्या बैठकीत शहरातील प्रमुख ३२ रस्ते आणि ५२ चौकांमधील वाहतुकीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच्या अहवालावर या बैठकीत चर्चा झाली. यामध्ये वाहतुकीला अडथळा ठरणारे विजेचे खांब हटवणे, पदपथांची अतिरिक्त रुंदी कमी करणे, चँपरमध्ये सुधारणा करणे, अतिक्रमण दूर करणे आदी उपाययोजना करण्यात येत आहेत, त्यामुळे वाहतुकीचा वेग १० टक्क्यांनी वाढला असल्याचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले. मेट्रोचे जाळे विस्तारत असून ‘पीएमपी’च्या बसची संख्याही वाढविण्यात येत आहे. दरवर्षी चार लाख नव्या खासगी वाहनांची भर पडत आहे. ऑटो रिक्षांचे परवाने खुले केल्याने रिक्षांची संख्या सव्वालाखाच्या वर गेली आहे. ही संख्या वाढल्यास रस्त्यावर रिक्षांची गर्दी वाढून वाहतूक कोंडीत भर पडणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला पत्र पाठवून रिक्षा परवान्यांवर निर्बंध आणावेत, अशी विनंती केली जाणार आहे. शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांबरोबरच अल्पकालीन उपाययोजनांवर अधिक भर दिला जात आहे.
पालिका आणि पोलिस अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे बोट
शहरातील वाहतूक काेंडी वरून पालिका आणि पोलिस अधिकाऱ्यांनी परस्परांकडे बोट दाखविले. त्यावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दोन्ही घटकांनी समन्वयाने काम केल्यास यातून मार्ग निघेल, असा मध्यममार्ग काढून वादावर पडदा टाकला.
श्री कंट्रोल चौकात सुधारणा
नऱ्हे येथील श्री कंट्रोल चौकात महावितरणचे अनेक खांब आहेत. तेथे बंद पडलेल्या गाड्यांनी अतिक्रमण केले आहे. पुढील महिन्याभरात हे खांब काढून टाकले जाणार आहेत. त्यामुळे या चौकातील वाहतूक कोंडी संपू शकते. त्यावर आजच्या बैठकीच चर्चा झाली आहे, असे अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी सांगितले.