प्रयागराजसाठी वाढत चालली भाविकांची संख्या; विमान, रेल्वेसह ट्रॅव्हल्सला जोरदार मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:44 IST2025-01-31T13:43:52+5:302025-01-31T13:44:03+5:30
आतापर्यंत पुण्याहून जवळपास ५०० ट्रॅव्हल्स प्रयागराजला जाऊन आल्या आहेत, तर पुढील काही दिवसांत ४०० ट्रॅव्हल्स बुकिंग झाले आहेत

प्रयागराजसाठी वाढत चालली भाविकांची संख्या; विमान, रेल्वेसह ट्रॅव्हल्सला जोरदार मागणी
पुणे: पुण्याहून कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे ट्रॅव्हल्स, खासगी कारला मागणी वाढली आहे. शिवाय रेल्वेला गर्दी वाढल्याने जादा रेल्वे सोडण्यात येत आहे. दुसरीकडे विमानाचे तिकीट दर वाढल्याने भाविकांकडून ट्रॅव्हल्सला मागणी वाढली असून, आतापर्यंत पुण्याहून जवळपास ५०० ट्रॅव्हल्स प्रयागराजला जाऊन आल्या आहेत. तर पुढील काही दिवसांत ४०० ट्रॅव्हल्स बुकिंग झाले आहेत, अशी माहिती बस अँड कार ओनर्स असोसिएशनकडून देण्यात आली.
कुंभमेळ्याला विशेष महत्त्व आहे. यामुळे या मेळाव्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुण्यातून कुंभमेळ्याला जाणाऱ्यांची संख्या यंदा वाढली आहे. पुण्यातून कुंभसाठी विशेष रेल्वे गाड्यादेखील सोडण्यात येत आहे. त्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. तसेच, विमानाने देखील जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विमानाचे तिकीट दर वाढले असले तरी देखील अनेकांकडून विमान प्रवासाला पसंती दिली जात आहे. याबरोबरच खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी कुंभमेळ्यासाठी गाड्या जाणार असल्याची जाहिरात केली आहे. त्यांनादेखील चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्यामुळे ट्रॅव्हल्स आणि खासगी कार चालकांना अच्छे दिन आले आहेत.
स्लीपर ट्रॅव्हल्सला भाविकांची पसंती
कुंभमेळ्याला आतापर्यंत पुण्यातून ५०० खासगी ट्रॅव्हल्स जाऊन आल्याचे दिसून आले आहे. याबाबत त्यांनी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे परमीट काढून प्रवास केला आहे. तसेच, येत्या काही दिवसांमध्ये ४०० खासगी ट्रॅव्हल्सचे बुकिंग झाले असल्याचे दिसून आले आहे. पुण्यातून प्रयागराज हे अंतर साडेतीन हजार किलोमीटर आहे. त्यामुळे स्लीपर ट्रॅव्हल्सला भाविकांची पसंती आहे. ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून पाच दिवसांमध्ये ही यात्रा घडविली जाते. त्यासाठी १५ हजारांच्या पुढे तिकीट आकारले जात आहे. काही साध्या खासगी ट्रॅव्हल्सदेखील कुंभमेळा दर्शनासाठी बुकिंग झाल्या आहेत. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.
कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स, कार यांना मागणी आहे. पुण्याहून प्रतिप्रवासी १५ हजार तिकीट आकारले जात आहे. विमानापेक्षा ट्रॅव्हल्सचे तिकीट दर कमी आहे. शिवाय भाविकांना इतर देवदर्शनाची संधी मिळत आहे. काही दिवसांत ४०० ट्रॅव्हल्स प्रयागराजसाठी बुक झाले आहेत. - राजन जुनवणे, अध्यक्ष, बस अँड कार ओनर्स असोसिएशन, पुणे
असे आहेत तिकीट दर
विमान - ४० ते ५० हजार
रेल्वे (३ ए) - १६५०
ट्रॅव्हल्स - १५ हजार