पुणे : काेंढवा बु. परिसरातील सर्व्हे क्र. ६३ मध्ये विनापरवानगी बऱ्याच झाडांची ताेड केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. त्याबाबत ‘लाेकमत’ने विविध वृत्तांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने संबंधित वृक्षताेडीचा पंचनामा केला आणि संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दाेन प्रमुख व्यक्तींविराेधात नाेटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती कोंढवा- येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे हॉर्टिकल्चर मिस्त्री विजय नेवसे यांनी दिली.
काेंढवा परिसरात अलीकडील काळात वाढलेली बांधकामे, वेगवेगळे येत असलेले प्रकल्प यामुळे परिसरातील हरित क्षेत्रात माेठी घट हाेत आहे. विशेषत: बांधकामासाठी अनेक ठिकाणी विनापरवाना अनेक झाडे ताेडली जात आहेत. हरित क्षेत्रात हाेत असलेली घट, महापालिकेची त्याला मिळणारी मूक सहमती, प्रकल्प राबवणारे आणि राजकर्ते यांची मिलीभगत या सर्वांचा परिणाम शहराच्या प्रदूषणात माेठी वाढ हाेत आहे. शासनाकडून बेकायदा वृक्षताेड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना असल्या तरीही काेंढवा बु. परिसरातील राजगृही रेसिडेन्सीलगत असलेल्या प्लॉटवरील वृक्षतोड करण्यात आली. याबाबत ‘लाेकमत’ने आवाज उठवत ‘काेंढव्यात झाडांची विनापरवाना कत्तल’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्याचा पाठपुरावा करत या वृक्षताेडीचा पंचनामा करण्यास प्रशासनाला भाग पाडले. त्यानंतर पालिका प्रशासनाकडून अटरिया कन्स्ट्रक्शनचे अनिल रेड्डी आणि धनंजय थिटे यांना नाेटीस बजावण्यात आली.
झाडे किंवा झाडांच्या फांद्या तोडायच्या असल्यास वनखात्याची परवानगी आवश्यक असते. मात्र, परवानगी न घेतल्यामुळे या जागेचा पंचनामा करण्यात आला आहे. विनापरवानगी झाडे तोडल्याप्रकरणी अटरिया कन्स्ट्रक्शनचे अनिल रेड्डी व धनंजय थिटे यांना नोटीस बजाविली आहे.-विजय नेवसे, हाॅर्टिकल्चर मिस्त्री, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय