केवळ एकदाच नव्हे तर अनेकदा खरात सोबत संपर्कात; नीलम गोऱ्हे यांची चौकशी करा, तृप्ती देसाईंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 15:37 IST2026-03-30T15:36:26+5:302026-03-30T15:37:08+5:30
नाशिकमधील एका हॉटेलमध्ये खरात आणि गोऱ्हे यांची भेट झाल्याचा दावा करत, त्या वेळी खरातला बंदुकीचे लायसन्स मिळवण्यासाठी मध्यस्थी करण्यात आली का? असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला आहे

केवळ एकदाच नव्हे तर अनेकदा खरात सोबत संपर्कात; नीलम गोऱ्हे यांची चौकशी करा, तृप्ती देसाईंची मागणी
पुणे : राज्यात गाजत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता नवे वळण आले असून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
ज्या कार्यालयात भोंदू बाबा अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्याच ठिकाणी नीलम गोऱ्हे या त्याला भेटण्यासाठी गेल्या होत्या. तसेच, त्या केवळ एकदाच नव्हे तर अनेकदा त्याच्याशी संपर्कात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. देसाई यांच्या म्हणण्यानुसार, नीलम या विधान परिषद आमदारकीच्या प्रयत्नात असताना देखील अशोक खरात याला भेटण्यासाठी गेल्या होत्या. तसेच मंत्रीपदाच्या शर्यतीत असताना देखील त्यांनी त्याची भेट घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या भेटींचा उद्देश “हात दाखवणे”, पूजा किंवा अन्य कारणांसाठी होता का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय, नाशिकमधील Express Inn या हॉटेलमध्ये अशोक खरात आणि नीलम गोऱ्हे यांची भेट झाल्याचा दावा करत, त्या वेळी खरातला बंदुकीचे लायसन्स मिळवण्यासाठी मध्यस्थी करण्यात आली का, याचाही तपास करण्याची गरज असल्याचे देसाई यांनी म्हटले आहे.
तसेच, अशोक खरात याच्यावर कथित हवाला रॅकेट चालवण्याचे आरोप असताना, या संदर्भात नीलम गोऱ्हे यांना काही माहिती होती का? त्यांच्यात कोणती आर्थिक देवाण-घेवाण झाली का? किंवा कोणत्याही प्रकारची धार्मिक विधी (पूजा) झाली का? या सर्व बाबींचा तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. देसाई यांनी (SIT) मार्फत एक्सप्रेस इन हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची आणि नीलम गोऱ्हे यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.