Eknath Shinde: 'महायुतीत दंगा नको', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना समजावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 12:59 IST2025-10-13T12:58:16+5:302025-10-13T12:59:32+5:30
पुण्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे, गुन्हेगाराला क्षमा नाही

Eknath Shinde: 'महायुतीत दंगा नको', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना समजावले
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर हे गुन्हेगारीवरून टीका करत आहेत. त्यावरून धंगेकर यांची त्यांच्या नेत्याकडे तक्रार केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले होते. त्याबद्दल विचारले असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, धंगेकर यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांना मी महायुतीत दंगा नको असे शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. ब्राम्हण जागृती सेवा संघ यांच्या वतीने दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार या सोहळ्यानंतर ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, पुण्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे. गुन्हेगाराला क्षमा नाही. कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही. पुणे हे गुन्हेगारीमुक्त झाले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. पोलीस सक्षमपणे काम करत आहेत.
....तिथे हा एकनाथ शिंदे पोचला
जिथे गरज आहे, संकट आहे, तिथे हा एकनाथ शिंदे पोचला, असे सांगून एकनाथ शिंदे म्हणाले, सर्वसामान्य शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास सोपा नव्हता. पण कार्य करत आलो. शेतकऱ्यांना मदतीसाठी दिवाळीपूर्वी ३२ हजार कोटी पॅकेज जाहीर केले आहे. सामान्यांचे सरकार म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, लाडका भाऊ म्हणून ओळख मिळाली आहे, त्यामुळे ती बंद होणार नाही. एका मुलीने उच्च शिक्षण घेत असताना खर्चासाठी आत्महत्या केली, मी उच्च शिक्षण मंत्र्यांना फोन केला, त्यावर पूर्ण शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला. सत्ता येते आणि जाते, पण एकदा गेलेले नाव परत येत नाही, असे शिंदे यांनी सांगितले.
ब्राम्हण समाज जातीय सलोखा वाढविण्यात पुढे
सध्या जातीच्या भिंती उभ्या राहत आहेत. पण, ब्राम्हण समाज जातीय सलोखा वाढविण्यात पुढे आहे. जातीच्या भिंती तोडून ज्याच्याकडे उत्तम आहे ते समाजासाठी द्यायला हवे, असे सांगतानाच आगामी काळात परशुराम आर्थिक विकास महामंडळाला अधिक चालना देण्याचे काम केले जाईल, असेहि एकनाथ शिंदे यांनी सांगितले.