HSC Exam Result 2025: कोणताही खासगी क्लास नाही; शेतकऱ्याच्या मुलीने मिळवले तब्बल ९५ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 12:23 IST2025-05-06T12:20:51+5:302025-05-06T12:23:11+5:30
गावाकडं माझ्या वयातील सर्व मुलींचा विवाह झालाय, पण आई- बाबांनी नेहमी माझ्या शिक्षणाला प्राधान्य दिलं, मी पुढं जाऊन अधिकारी होणार

HSC Exam Result 2025: कोणताही खासगी क्लास नाही; शेतकऱ्याच्या मुलीने मिळवले तब्बल ९५ टक्के
उजमा शेख
पुणे : ती मूळची धाराशिव जिल्ह्यातील (उस्मानाबाद) विठ्ठलवाडी गावाची. आई- वडील दोन्ही शेतकरी, वडिलांना बारावीत ६७ टक्के गुण मिळाले होते. वडिलांना पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा होती; पण घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. मात्र, मुलगी माया माने हिने वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करत फर्ग्युसन कॉलेजमध्ये बारावीत तब्बल ९५ टक्के गुण मिळवले. त्यामुळे घरच्यांना आनंदाश्रू रोखता आले नाहीत. वडिलांना जेव्हा बारावीचा निकाल फोनवर सांगितला, तेव्हा वडील म्हणाले, खरंच! एवढे गुण मिळाले... आणि त्यानंतर वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहले.
शैक्षणिक प्रवासासाठी पुण्यात आलेल्या मायाला दहावीत चांगले गुण मिळाले होते. त्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालयात अकरावीत प्रवेश मिळाला. मायाचा प्रवास तसा खडतरच होता. आई- वडील धाराशिव जिल्ह्यातील विठ्ठलवाडी गावात शेती करतात. कोणताही खासगी क्लास नाही, फक्त पाठ्यपुस्तके, शिक्षकांचे मार्गदर्शन, महाविद्यालयात होणारी दररोजच्या लेक्चरला उपस्थिती आणि अभ्यास करून तिने हे घवघवीत यश मिळवले.
राज्यात यंदा कला शाखेचा निकाल पाच टक्क्यांनी कमी लागला असताना माया माने हिने ९५ टक्के गुण मिळवले. महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहून स्वावलंबीपणे शिक्षण घेणाऱ्या मायाने अभ्यासात सातत्य ठेवले. ग्रामीण भागातून येऊन मोठ्या शहरात स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या मायाने सर्व विद्यार्थ्यांना दाखवून दिलेय की, हातात फक्त पुस्तके असली तरी स्वप्न गाठता येते.
आई-वडील शेती करतात, मी त्यांचं कष्टाचं आयुष्य जवळून पाहिलंय. मला पुढं जाऊन अधिकारी व्हायचंय, त्यासाठी ही सुरुवात माझ्या यशाची पहिली पायरी आहे, मला परीक्षेत मिळालेले यश हे वडिलांना त्यांचंच वाटतंय. गावाकडं माझ्या वयातील सर्व मुलींचा विवाह झाला आहे. एव्हाना त्यांना मुलंही झाली आहेत; पण आई- बाबांनी नेहमी माझ्या शिक्षणाला प्राधान्य दिलं आणि त्यांच्या पाठिंब्यामुळंच आज मला हे यश मिळालं. -माया माने (विद्यार्थिनी)