ना टाळ-मृदंगाचा गजर, ना कीर्तनाचा सूर; पालखी विसावणाऱ्या नाना आणि भवानी पेठेत यंदा कोरोनामुळे 'विसावा' 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:22 AM2020-06-17T11:22:47+5:302020-06-17T11:31:51+5:30

दरवर्षी पुण्यात मुक्कामी राहणाऱ्या पालखी सोहळ्यात यंदा कोरोनामुळे खंड पडल्याची हुरहूर सर्वांच्याच मनाला लागून राहिली... 

No pandhapur palkhi palkhi sohla in Nana and Bhavani Peth this year due to corona | ना टाळ-मृदंगाचा गजर, ना कीर्तनाचा सूर; पालखी विसावणाऱ्या नाना आणि भवानी पेठेत यंदा कोरोनामुळे 'विसावा' 

ना टाळ-मृदंगाचा गजर, ना कीर्तनाचा सूर; पालखी विसावणाऱ्या नाना आणि भवानी पेठेत यंदा कोरोनामुळे 'विसावा' 

Next
ठळक मुद्देसंपूर्ण परिसरात नीरव शांततेचे चित्र

नम्रता फडणीस- 
पुणे: ना टाळ-मृदुंगाचा गजर...ना मंदिरामध्ये कीर्तनाचा सूर ...ना गर्दीने फुललेला परिसर... ना वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यकर्ते आणि भाविकांची लगबग...हे चित्र आहे, नाना आणि भवानी पेठेतील. दरवर्षी पुण्यनगरीत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या मुक्कामी असलेल्या पालख्यांमुळे पूर्णत: गजबजलेल्या या परिसरात कोरोनामुळे एक नीरव शांतता अनुभवायला मिळत आहे. यंदा पालख्यांचे दर्शन घेता न आल्याने कार्यकर्त्यांसह भाविक हवालदिल झाले आहेत. 
   

पांडुरंगाच्या भेटीसाठी अलंकापुरीकडे निघालेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे दरवर्षी पुण्यनगरीत जल्लोषात आगमन होते. प्रथेप्रमाणे पुणे मुंबई रस्त्यावरील कमल बजाज उद्यान येथे पालख्यांचे स्वागत केल्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालय, फर्ग्युसन रस्ता, डेक्कन, लक्ष्मी रस्ता मार्गे यापालख्यांचा पावनस्पर्श पुण्यभूमीला होतो. अवघी पुण्यनगरी भक्तिरसात न्हाऊन निघते. श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसावते. दोन दिवस पालख्यांचा पुण्यनगरीत मुक्काम असतो.

यंदाच्या वर्षी १२ जूनला श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहूतून तर १३ जूनला श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान झाले. त्यानुसार १४ आणि १५ जूनला या दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यात असला असता. मात्र यंदा दोन एकादशी आल्यामुळे १६ जूनसह तीन दिवस पालखी पुणे मुक्कामी राहिली असती आणि शुद्ध एकादशीला आज (१७ जून) या पालख्यांचे पुण्यातून प्रस्थान झाले असते..मात्र आज नाना आणि भवानी पेठेतील चित्र काहीसे वेगळेच पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटामुळे हे दोन्ही भाग कंटेन्मेंट झोन मध्ये येत असल्याने या परिसरात पूर्णत: संचारबंदी लागू आहे..रस्ते बॅरिकेट्स टाकून बंद करण्यात आले आहेत. दुकानांची शटर पूर्णत: बंद आहेत...रस्त्यावर शुकशुकाट असल्याचे चित्र आहे..दरवर्षी पंढरपूरच्या वारी सोहळ्यादरम्यान या परिसरात वैष्णवांचा मेळा भरल्याचे पाहायला मिळते..

श्री निवडुंग्या विठोबा मंदिर आणि पालखी विठोबा मंदिरात पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडालेली असते...वारकऱ्यांना अन्न, पाणी, न्हावी, चप्पल सेवेसह मेडिकल सेवेसाठी स्वयंसेवी संस्था, गणेश मंदिरांचे कार्यकर्ते यांची लगबग सुरू असते..या परिसरात व्यापारी वर्ग मोठा असल्याने पालखी काळात अनेकांचा चांगला व्यवसाय होतो..पुढचे सहा महिने त्यांचे उत्तम जातात..यंदा मात्र या परिसरात नीरव शांततेची अनुभूती पाहायला मिळत आहे.दरवर्षी पुण्यात मुक्कामी असलेल्या पालखी सोहळ्यात यंदा कोरोनामुळे खंड पडल्याची हुरहूर कार्यकर्त्यांसह सर्वांच्याच मनाला लागून राहिली. 

..... 
आम्ही दरवर्षी वारकऱ्यांच्या सेवेतच ' पांडुरंग' अनुभवतो. वारकऱ्यांसाठी भजन कीर्तनाबरोबरच शेतीविषयी माहिती देणारे काही उपक्रम राबवितो. संपूर्ण परिसर भक्तीमय होऊन जातो. यंदा कोरोनामुळे पालख्यांचे दर्शन घेता आले नसल्याची मनाला हुरहूर वाटत आहे.

- भाई कात्रे, कार्याध्यक्ष, साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिर
....... 
पुण्यात पालखीचे आगमन झाल्यानंतर आमची श्री निवडुंगा विठोबा मंदिर भजनी मंडळाची दिंडी पालखीमध्ये सहभागी होते..आणि मग संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी श्री निवडुंगा विठोबा मंदिरात आणली जाते..भाविकांची दर्शनासाठी झुंबड उडते..यंदा हे वातावरण अनुभवायला मिळणार नसल्याने जगणंच विचित्र वाटायला लागले आहे..काही सुचतच नाही..दरवर्षी या काळात गर्दी बघायची सवय झालेली आहे. संपूर्ण वाडा वारकऱ्यांच्या गर्दीने फुललेला असतो..ते सगळं वातावरण डोळ्यासमोर उभे राहून मन गलबलून येत आहे.

- नंदकुमार भांडवलकर, श्री निवडुंगा विठोबा मंदिर भजनी मंडळ.

Web Title: No pandhapur palkhi palkhi sohla in Nana and Bhavani Peth this year due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.