अध्यक्ष कोणीही करा, पण शून्य गुणिले शून्य बरोबर शून्यच! शेलारांची आघाडीवर टीका
By राजू इनामदार | Updated: February 14, 2025 17:31 IST2025-02-14T17:30:04+5:302025-02-14T17:31:49+5:30
मी महाविकास आघाडीची एक्सापायरी डेट जवळ आल्याचे स्पष्ट केले होते, ते आता खरे ठरत आहे

अध्यक्ष कोणीही करा, पण शून्य गुणिले शून्य बरोबर शून्यच! शेलारांची आघाडीवर टीका
पुणे : कोणाला अध्यक्ष करायचे हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, मात्र मी गणिताचा विद्यार्थी असल्याने ‘शून्य गुणिले शून्य इज इक्वल टू शून्य हेच उत्तर येते’ हे मला माहीत आहे. त्यामुळे अध्यक्ष कोणीही केला तरी काँग्रेस शून्यच आहे, अशी टीका सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केली. काँग्रेसच्या नूतन प्रदेशाध्यक्ष निवडीवरून ते बोलत हाेते. महाविकास आघाडीची एक्सापायरी डेट जवळ आली आहे, असेही ते म्हणाले.
पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन गुरूवारी सायंकाळी शेलार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी काही राजकीय विषयांवर संवाद साधला. भाजपकडून ईडीचा त्रास दिला जातो, त्यामुळे कोरी पाटी असलेला अध्यक्ष द्यायचा या विचाराने काँग्रेसने अध्यक्ष निवडला, असे शेलार म्हणाले. ज्यांची पाटी कोरी आहे, ते आमच्या पीएच. डी. च्या विद्यार्थ्यांशी काय लढणार, असा प्रतिप्रश्न केला.
विधानसभेचे जागा वाटप सुरू होते, त्याचवेळी मी महाविकास आघाडीची एक्सापायरी डेट जवळ आल्याचे स्पष्ट केले होते. ते आता खरे ठरत आहे, असेही शेलार म्हणाले. दुसऱ्या पक्षात कोणी प्रवेश केला की लगेचच त्याला ब्लॅकमेलिंग केले असे म्हटले जाते. मात्र उद्धव ठाकरे यांनी आमच्या पक्षातील काही लोकांना त्यांच्या पक्षात प्रवेश दिला, त्यावेळी आम्ही काय अशीच टीका केली होती का? त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यामुळे असे बोलले जाते, असेही शेलार म्हणाले. उपमुख्यमंत्री शिंदे काहीही नाराज वगैरे नाही. मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्री एकमताने, परस्परांशी चर्चा करून निर्णय घेत आहेत. त्यामुळे शिंदेच काय कोणीही नाराज नाही. सगळे काही आलबेल आहे, सगळे व्यवस्थित काम करत आहेत, मी तुमच्यासमोर उभा आहे, असेही शेलार म्हणाले.