राहुल गांधी यांच्या लंडनमधील कार्यक्रमात भारतीय पत्रकार असल्याबाबत माहिती नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 11:56 IST2026-03-27T11:48:39+5:302026-03-27T11:56:20+5:30
राहुल गांधी यांनी मार्च २०२३ मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक विधान केले होते.

राहुल गांधी यांच्या लंडनमधील कार्यक्रमात भारतीय पत्रकार असल्याबाबत माहिती नाही
पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते व खासदार राहुल गांधी यांचे लंडनमधील कथित भाषण कोणी रेकॉर्ड केले, कुठे रेकॉर्ड झाले, त्या भाषणाला भारतातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कोणी पत्रकार स्वत: व इतर कोण श्रोते उपस्थित होते, याबाबत कोणतीही प्रत्यक्ष माहिती नाही, असे उलटतपासणी दरम्यान फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी सांगितले. या खटल्याची पुढील सुनावणी ३१ मार्च रोजी होणार आहे.
राहुल गांधी यांनी मार्च २०२३ मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक विधान केले होते. त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. पुण्यातील एमपीएमएलए विशेष न्यायालयात या दाव्याची सुनावणी सुरू आहे. राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांच्याकडून फिर्यादी सात्यकी सावरकर यांची उलट तपासणी चालू आहे. या प्रकरणात उलट तपासादरम्यान ॲड. पवार यांनी विविध तांत्रिक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले.
उलटतपासणी दरम्यान फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी मान्य केले की, प्रकरणातील न्यायालयातून गहाळ असलेल्या महत्त्वाच्या सीडी संदर्भात त्यांच्याकडून कोणतीही तक्रार केलेली नाही, तसेच त्या गहाळ सीडी बाबत कोणतीही सखोल चौकशी आजपर्यंत झालेली नाही. तसेच, सादर केलेले शब्दांकन यावर तारीख नाही, एका शब्दांकनावर त्यांची स्वतःची सही नाही, दोन्ही शब्दांकनाचा मजकूर एकसारखाच आहे आणि ते मूळ सीडीवर आधारित असल्याने तो मजकूर सिद्ध होऊ शकलेला नाही.
याशिवाय पोलिस तपास प्रक्रियेमध्ये देखील गंभीर त्रुटी दिसून आल्या आहेत. पोलिसांनी संबंधित इलेक्ट्रॉनिक पुराव्याचा हॅश व्हॅल्यू काढलेला नाही. भारतीय पुरावा कायद्याअंतर्गत आवश्यक असलेले कलम ६५(ब) चे प्रमाणपत्र योग्य प्रकारे संकलित करण्यात आलेले नाही, तसेच यूट्यूब लिंक किंवा डिजिटल पुराव्यांची शास्त्रीय पडताळणी करण्यात आलेली नाही, असेही फिर्यादी सावरकर यांनी नमूद केले.