'कुठून बिबट्या येईल, याचा नेम नाही', जुन्नरच्या पूर्व भागात बिबट्याचा उच्छाद; शेतकरी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 10:29 IST2025-09-17T10:29:27+5:302025-09-17T10:29:40+5:30

रात्री घराबाहेर पडणेही धोक्याचे झाले असून केवळ पाळीव प्राण्यांवरच नव्हे, तर मनुष्यांवरही बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत

'No idea where the leopard will come from', leopard spotted in eastern part of Junnar; Farmers shocked | 'कुठून बिबट्या येईल, याचा नेम नाही', जुन्नरच्या पूर्व भागात बिबट्याचा उच्छाद; शेतकरी हैराण

'कुठून बिबट्या येईल, याचा नेम नाही', जुन्नरच्या पूर्व भागात बिबट्याचा उच्छाद; शेतकरी हैराण

बेल्हा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांच्या समस्येने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. वारंवार होणाऱ्या पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांमुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून, मनुष्यांवरही हल्ले वाढल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून जनजागृती आणि पंचनामे सुरू असले तरी कायमस्वरूपी तोडगा काढण्यात अपयश आले आहे. या संकटातून सुटका होण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

पूर्व जुन्नर तालुक्यातील बेल्हा आणि परिसरात बिबट्यांची समस्या वर्षानुवर्षे जुनी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. ऊसशेतीच्या मुबलक उपलब्धतेमुळे बिबट्यांसाठी हे क्षेत्र हक्काचे निवासस्थान बनले आहे. पाण्याची सहज उपलब्धता आणि प्रजननासाठी अनुकूल वातावरण यामुळे बिबट्यांची संख्या वाढतच चालली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात सध्या ५ ते ६ बिबटे असावेत, त्यात काही बिबट्यांसोबत बछडेही दिसत आहेत. यामुळे दिवसा आणि रात्री कधीही बिबट्याचे दर्शन होण्याच्या घटना वाढल्या आहेत.

गेल्या दोन ते चार दिवसांतच या भागात बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक पाळीव प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. शेळ्या, कालवडी यांसारख्या जनावरांवर हल्ले झाले असून, शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. वनविभागाकडून या घटनांचे रीतसर पंचनामे करण्यात येत आहेत, मात्र हे पुरेसे नसल्याचे शेतकरी सांगतात. "बिबट्यांना पिंजऱ्यात पकडण्यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते, यामुळे कारवाईत विलंब होतो," असे वनविभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. परिणामी, शेतकरी वर्गाला हातावर हात ठेवून बसण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

या भागातील शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जीव मुठीत धरून जावे लागत आहे. "कुठून बिबट्या येईल, याचा नेम नाही. रात्री घराबाहेर पडणेही धोक्याचे झाले आहे," अशी व्यथा एका स्थानिक शेतकऱ्याने व्यक्त केली. केवळ पाळीव प्राण्यांवरच नव्हे, तर मनुष्यांवरही बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. सध्या पडत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले आहे, त्यामुळे बिबटे कोरड्या ठिकाणी येऊन हल्ले करीत असल्याचे निरीक्षण आहे. यामुळे परिसरातील मानवी जीवनावर संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे.

वनविभागाकडून या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. जनजागृती मोहिमा राबवल्या जात असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसून येत आहे. "वर्षानुवर्ष ही समस्या असूनही वनखाते हतबल झाले आहे. कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी ठोस कारवाईची गरज आहे," अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. बिबट सफारीसारख्या पर्यटन उपक्रमांद्वारे या समस्येवर तोडगा काढता येईल का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही स्पष्ट योजना दिसत नाही. या समस्येवर लक्ष केंद्रित करून लोकमतने वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, "आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. जनजागृतीसोबतच बिबट्यांना पकडण्यासाठी परवानग्या घेण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात येत आहे." मात्र, शेतकरी वर्गाला हे आश्वासन पुरेसे वाटत नाही. जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील ही समस्या केवळ स्थानिक नसून, संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रातील वन्यप्राणी-मानवी संघर्षाचे प्रतिबिंब आहे. यावर शासन स्तरावरून धोरणात्मक गरज आहे, अन्यथा शेतकऱ्यांचे जीवन अधिक धोकादायक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: 'No idea where the leopard will come from', leopard spotted in eastern part of Junnar; Farmers shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.