हार नको, गुच्छ नको.... आपल्या ‘छत्रपती’ला गाळपासाठी ऊस द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:17 IST2025-06-12T17:11:08+5:302025-06-12T17:17:12+5:30

- श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सभासदांना भावनिक साद

No garlands, no bunches Give sugarcane to our Chhatrapati for crushing | हार नको, गुच्छ नको.... आपल्या ‘छत्रपती’ला गाळपासाठी ऊस द्या

हार नको, गुच्छ नको.... आपल्या ‘छत्रपती’ला गाळपासाठी ऊस द्या

बारामती : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सत्काराला हार-गुच्छ देऊ नका, पण कारखान्याला गाळपासाठी ऊस द्या, अशी भावनिक साद सभासदांना घातली आहे. कारखान्याने यंदा १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

‘छत्रपती’ला पूर्ववैभव प्राप्त करून देण्याच्या अटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सत्ताधाऱ्यांसह शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक आणि त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत मोट बांधली. सभासदांनीही या अनोख्या युतीवर विश्वास ठेवत संचालक मंडळाला भरभरून मतदान करत निवडून दिले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे जाचक यांच्यावर अध्यक्ष पदाची तर कैलास गावडे यांच्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर अध्यक्ष जाचक आणि संचालक मंडळाने आत्तापासूनच कंबर कसली आहे. विजयानंतर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाला गावाेगावी सत्कारासाठी निमंत्रण येत आहेत. 

मात्र, संचालक मंडळाने शेतकऱ्यांना आवाहन केले असून, आम्हाला सत्काराला हार-गुच्छ देऊ नका. तुम्ही मताच्या रूपाने आमचा सत्कार केला आहे. हार-गुच्छ नको... पण गाळपासाठी आपल्या कारखान्याला ऊस देण्याचे आवाहन करत सभासदांना साद घातली आहे. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये छत्रपतीच्या सभासदांचा सुमारे ८ ते ९ लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असतो. मात्र, काही सभासद ऊस गाळपासाठी छत्रपती कारखान्याला न देता दुसऱ्या कारखान्यांना देत असतात. याचा परिणाम ‘छत्रपती’च्या गाळपावर होत असून, गाळप कमी होत असल्याने कारखान्याचे व सभासदांचे नुकसान होते. कारखान्याला पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी साथ देण्याचे आवाहन केले आहे.
 
१२ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट...
या संदर्भात श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले की, चालूवर्षीच्या गळीत हंगामामध्ये १२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होणे गरजेचे आहे. तसेच साखरेचा उताराही जास्त मिळवण्यासाठी नियोजन सुरू आहे. यापूर्वी ‘छत्रपती’च्या कार्यक्षेत्रामध्ये १२ टक्केपेक्षा जास्त उतारा मिळाला होता. सभासदांनी चालूवर्षी सर्व ऊस आपल्या श्री छत्रपती कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जाचक यांनी केले आहे.

Web Title: No garlands, no bunches Give sugarcane to our Chhatrapati for crushing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.