नव्या चेहऱ्याला संधी नाही! भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 21:11 IST2025-05-13T21:10:09+5:302025-05-13T21:11:17+5:30
शहराध्यक्षपदी पुन्हा एकदा बदल होऊन नव्या चेहऱ्याला भाजप संधी देईल, अशी जोरदार चर्चा होती

नव्या चेहऱ्याला संधी नाही! भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटे
पुणे : भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी पुन्हा एकदा बदल होईल आणि नव्या चेहऱ्याला भाजप संधी देईल, अशी जोरदार चर्चा होती. पण भाजपने शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
भाजपमध्ये केंद्रापासून राज्यापर्यंत संघटनात्मक बदलाचे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत. भाजपकडून लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जाणार आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष देखील निवड होणार आहे. मात्र त्यापूर्वी मंडल अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आता शहर आणि जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमी वरती ही नियुक्ती रखडली होती. राज्यातील ५८ शहर आणि जिल्हाध्यक्ष पदांच्या नियुक्त्या भाजपने जाहीर केल्या आहेत. अनेक ठिकाणी पक्षाने नवीन नेत्यांना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवलेली असताना पुण्यात मात्र पुन्हा एकदा पक्षाने शहराध्यक्ष पदासाठी धीरज घाटे यांच्याच नावाला पसंती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपकडून या पदांच्या नियुक्तीसाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये पुणे शहर, मावळ, बारामती आणि पिंपरी चिंचवड ची जबाबदारी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे देण्यात आली होती. धनंजय महाडिक यांच्या निरीक्षणाखाली पुण्यामध्ये शहराध्यक्ष पदासाठी मतदान देखील झालं.पुण्यातील तब्बल 45 ते 50 मतदानाचा अधिकार असलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पसंतीची तीन नावे कळवली होती. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरती बैठक घेऊन शहराध्यक्ष पदाची नावे फायनल करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले आणि सध्याचे अध्यक्ष असलेल्या धीरज घाटे यांचं नाव आघाडीवर होत. शहराध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी देखील घाटे यांनी आपल्याला कार्यकाल वाढवून द्यावा, अशी मागणी केली होती. आपल्या कार्य काळामध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका आल्याने सध्याच्या कार्यकारणीला अधिकचा वेळ द्यावा, अशी मागणी धीरज घाटे यांनी केली होती. त्यानुसार भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची निवड करण्यात आली आहे.