बहिणीसह कपडे धुण्यासाठी गेलेल्या ९ वर्षीय मुलीचा तळ्यात बुडून मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 21:33 IST2022-02-10T21:30:28+5:302022-02-10T21:33:31+5:30
वाघोली पीएमआरडीए अग्निशमन दलाने तळ्यामध्ये तीन तास शोधकार्य करून मुलीचा मृतदेह बाहेर काढला.

बहिणीसह कपडे धुण्यासाठी गेलेल्या ९ वर्षीय मुलीचा तळ्यात बुडून मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना
वाघोली : वाघोली (ता. हवेली)-भावडी रोडलगत असणाऱ्या भैरवनाथ तळ्यामध्ये बहिणीसह कपडे धुण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलगी पाय घसरून तळ्यामध्ये पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.१०) दुपारी ३ च्या सुमारास घडली. वाघोली पीएमआरडीए अग्निशमन दलाने तळ्यामध्ये तीन तास शोधकार्य करून मुलीचा मृतदेह बाहेर काढला.
सोनाक्षी विजय राखपसरे (रा. बुरुंजआळी, वाघोली) असे बुडून मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोनाक्षी व तिची बहीण संगीता या कपडे धुण्यासाठी भैरवनाथ तळ्यामध्ये गेल्या होत्या. बहीण कपडे धूत असताना थोड्या अंतरावर पायऱ्यांच्या कोपऱ्याला गेलेली सोनाक्षी ही पाय घसरून तळ्यामध्ये पडली. पोहता येत नसल्याने ती बुडाली. बहिणीने ही घटना इतरांना सांगितली. सोनाक्षीच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी लोणीकंद पोलीस व वाघोली पीएमआरडीएचे पथक तसेच महापालिका कर्मचारी तळ्यावर दाखल झाले. तीन तासाच्या प्रयत्नानंतर मुलीचा मृतदेह सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बाहेर काढला.