पुणे : जामखेड तालुक्यातील एका गावातील शेतात लपून बसलेला कुख्यात गुन्हेगार सचिन घायवळला पकडण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला ऐनवेळी अपयश आले. पोलिस येत असल्याची पूर्वकल्पना मिळताच सचिनने शेतातून पळ काढल्याचे समोर आले आहे. एका महिलेने त्याला पोलिस आल्याची माहिती दिल्याचा संशय पोलिसांना आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडला.
गुन्हे शाखेला सचिन घायवळ जामखेड तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाने त्या ठिकाणी धडक दिली. मात्र पोलिस गावात पोहोचल्याची चाहूल लागताच सचिन अलर्ट झाला आणि काही क्षणांतच घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिस त्याच्या अगदी जवळ पोहोचले होते, मात्र वेळेवर मिळालेल्या टिपमुळे तो निसटला.
दरम्यान, सचिनला पळून जाण्यास मदत करणारी संबंधित महिला पोलिसांच्या रडारवर आली आहे. तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सचिन घायवळ हा कुख्यात गुंड नीलेश घायवळचा मोठा भाऊ असून, दोघांविरोधात वारजे-माळवाडी पोलिस ठाण्यात खंडणीचा गंभीर गुन्हा दाखल आहे. कर्वेनगर व शिवणे परिसरातील एका नामवंत शाळेसाठी खाद्यपदार्थ व वाहतूक सेवा पुरवणाऱ्या खासगी कंपनीच्या संचालक महिलेकडून तब्बल ४४ लाख ३६ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल असून, सचिनवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर तो पुण्यातून फरार झाला.
दुसरीकडे, नीलेश घायवळ अद्याप विदेशात फरार असून तो लंडनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणासह बनावट पासपोर्टप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले असून, त्याच्या मालमत्तेवर टाच आणण्याची कारवाई सुरू आहे. तसेच प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांनी ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान, नीलेश घायवळ हा लंडनमध्ये त्याच्या मुलाकडे राहत असल्याची माहिती पोलिसांकडे असून, आरोपाला आश्रय दिल्याप्रकरणी नीलेशच्या मुलावरदेखील गुन्हा दाखल करता येऊ शकतो का, याबाबत पडताळणी करत आहेत.
Web Summary : Sachin Ghaywal, brother of Nilesh, evaded Pune police in Jamkhed. A woman is suspected of tipping him off. He's wanted in extortion cases. Nilesh is in London, facing extradition efforts.
Web Summary : निलेश घायवळ का भाई सचिन जामखेड में पुणे पुलिस से बच निकला। एक महिला पर टिप देने का शक है। वह उगाही के मामलों में वांछित है। निलेश लंदन में है, प्रत्यर्पण के प्रयास जारी।