Nilesh Ghaiwal: निलेश घायवळच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट अखेर रद्द, प्रादेशिक कार्यालयातून ऑर्डर जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 16:06 IST2025-10-23T16:05:18+5:302025-10-23T16:06:02+5:30
गुन्ह्याच्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र आणि नावाच्या बाबत खोटी कागदपत्रे सादर करून गुंड निलेश घायवळ याने अहिल्यानगर येथून पासपोर्ट मिळवला होता

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट अखेर रद्द, प्रादेशिक कार्यालयातून ऑर्डर जारी
पुणे : पुण्यातील कोथरूडमधील गोळीबारानंतर कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर पुणे पोलिसांकडून आतापर्यंत वेगवेगळ्या गंभीर प्रकाराचे दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून निलेशची आर्थिक बाजू कमकुवत करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न सुरू आहेत. मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला गुंड निलेश घायवळ सध्या स्वित्झर्लंडला आहे. त्याने घायवळ ऐवजी गायवळ नावाचा वापर करत पासपोर्ट मिळवण्याचे यापूर्वीच पोलिस तपासात समोर आले. त्यानंतर निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले होते.
निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आला आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून याबाबतची ऑर्डर जारी झाली आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळ बाबत अहवाल सादर केला होता. पासपोर्ट रद्द झाल्याने निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत. गुन्ह्याच्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र आणि नावाच्या बाबत खोटी कागदपत्रे सादर करून गुंड नीलेश घायवळ याने अहिल्यानगर येथून पासपोर्ट मिळवला होता. त्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अहिल्यानगर पोलिस दलाली एका पोलिस निरीक्षकासह दोघांना नोटीस बजावली होती.
निलेश घायवळ याने २०१९ मध्ये अहिल्यानगर पोलिसांकडून पासपोर्ट काढला आहे. तेथील राहता पत्ता आणि इतर कागदपत्रे देऊन त्याने हा पासपोर्ट काढला. त्यावेळी कागदपत्रांची व राहत्या पत्त्याची पडताळणी स्थानिक पोलिसांकडून करण्यात आली होती. मात्र, त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे नोंद असतानाही पासपोर्ट पडताळणी अहवाल स्वच्छ दाखवण्यात आला असा संशय व्यक्त झाला. कदाचित त्याच्या आडनावातील हेराफेरीमुळे गुन्हे प्रणालीतून त्याचे नाव सुटले असावे असा कयास लावला जातो आहे. मात्र, दुसरीकडे ‘डीएसबी’मध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांना तो माहिती नसावा असे देखील नाही असा संशय व्यक्त केला जात होता. या प्रकरणाची नोंद पुणे पोलिसांकडे आल्यानंतर त्यांनी संबंधित कागदपत्रांचा तपशील मागवून चौकशी सुरू होती.
पोलिसांना चकवा देत घायवळ परदेशात पळून गेला. विशेष म्हणजे त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला याविषयी पोलिस प्रशासनावरच ताशेरे ओढले जात होते. घायवळने पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये अहिल्यानगरमधील आपल्या गावाच्या पत्तावर त्याने पासपोर्ट काढला. विशेष म्हणजे पासपोर्टसाठी त्याने आपल्या आडनावात देखील बदल केला. 'घायवळ' ऐवजी 'गायवळ' नावाची कागदपत्रे त्याने सादर केली. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळ बाबत अहवाल सादर केला होता. आता त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.