पुणेकरांसाठी नवा सुरक्षा फॉर्म्युला; ‘कॉप्स २४’ तत्काळ मदतीसाठी सज्ज..!

By नितीश गोवंडे | Updated: January 29, 2025 09:37 IST2025-01-29T09:36:23+5:302025-01-29T09:37:59+5:30

‘कॉप्स २४’ माध्यमातून ७०० पोलिस कर्मचारी पुणेकरांच्या मदतीसाठी २४ तास उपलब्ध राहणार

New security formula for Punekars; 'Cops 24' ready for immediate help..! | पुणेकरांसाठी नवा सुरक्षा फॉर्म्युला; ‘कॉप्स २४’ तत्काळ मदतीसाठी सज्ज..!

पुणेकरांसाठी नवा सुरक्षा फॉर्म्युला; ‘कॉप्स २४’ तत्काळ मदतीसाठी सज्ज..!

पुणे :पोलिसांच्या कंट्रोल रूमला (नियंत्रण कक्ष) फोन करताच मदतीसाठी धावून येणारे बीट मार्शल आता ‘कॉप्स २४’ नावाने ओळखले जाणार आहे. या माध्यमातून ७०० पोलिस कर्मचारी पुणेकरांच्या मदतीसाठी २४ तास उपलब्ध राहणार आहेत. सध्या या कॉप्स ना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असून, त्यांच्यासाठी वेगळा ड्रेसकोडही असणार आहे.

गुन्हे शाखेकडून या कॉप्स २४ वर नियंत्रण ठेवले जाणार असून, चारचाकी आणि दुचाकीच्या सहाय्याने ते सर्वसामान्यांच्या मदतीसाठी तत्काळ हजर होणार आहेत. यामुळे पुणे पोलिसांचा रिस्पॉन्स टाईम देखील कमी होणार असून, अवैध धंद्यांवर देखील वचक निर्माण होण्यास मदत होणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था, परिणामकारक पेट्रोलिंग, अडचणीतील नागरिकांना तत्पर पोलिस मदत, पोलिसांचा रस्त्यावरील वावर, नागरिकांच्या मनात सुरक्षिततेचे वातावरण तयार करून पोलिस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ‘कॉप्स २४’ हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. सीआर मोबाईलसाठी २३४, तर कॉप्ससाठी ४९२ अशा ७२६ महिला आणि पुरुष अंमलदार यात असणार आहेत, विशेष म्हणजे २२ ते २८ वयोगटातील पोलिस कर्मचाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

पुणे पोलिसांकडून सध्या पोलिस ठाणे स्तरावर बीट मार्शल ही संकल्पना राबवली जाते. प्रत्येक पोलिस चौकीला रात्री आणि दिवसा अशा वेळी दोन-दोन अंमलदार बीट मार्शल म्हणून काम करतात. पोलिस ठाण्यात उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावर त्यांची संख्या अवलंबून असते. रस्त्यावरील गुन्हेगारी कमी करण्यासह एखादा गुन्हा घडल्यानंतर तत्काळ मदत आणि नागरिकांच्या मनात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याबरोबरच त्यांना अडचणीच्या काळात मदतीसाठी ही बीट मार्शल संकल्पना राबवली जात होती. मात्र मनुष्यबळ तसेच पोलिस ठाण्याच्या कामाचा ताण यामुळे प्रभावी पेट्रोलिंग होत नसल्याचे पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आले. तर काही बीट मार्शलचे भलतेच उद्योग निदर्शनास आल्याने, सध्याच्या बीट मार्शलचा मुख्य उद्देश साध्य होत नसल्याचे स्पष्ट झाले.

यावर उपाय म्हणून पोलिस आयुक्तांनी बीट मार्शलपेक्षा प्रभावी कामकाज व्हावे, यासाठी कॉप्स-२४ ही संकल्पना सुरू केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम प्रथम सुरू केला जाणार आहे. त्यानंतर त्याचे रूपांतर कामकाजात केले जाणार आहे. हा उपक्रम सुरू होताच पोलिस ठाण्याचे बीट मार्शल बंद होणार आहेत.

असा आहे उपक्रम...

कॉप्स - २४ मध्ये महिला आणि पुरूष मिळून असणार ७२६ अंमलदार

- अंमलदारांची वयोमर्यादा २२ ते २८

- रिस्पॉन्स टाईम ७ मिनिटांवरून ५ मिनिटांवर आणण्यासाठी प्रयत्न

- कॉप्ससाठी १२५ दुचाकी आणि ३९ चारचाकी वाहने

- दोन सत्रात (दिवस-रात्र) पेट्रोलिंग, प्रत्येक पोलिस ठाण्यासाठी एक कार

- काही घटना घडल्यास, तत्काळ पोहोचून मदत व प्राथमिक कार्यवाही

यापूर्वी चार्ली संकल्पना...
यापूर्वी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असताना ‘चार्ली’ ही संकल्पना राबवली होती. त्याची चर्चा आजही छत्रपती संभाजीनगर येथील नागरिकांमध्ये आहे. त्यावेळी देखील या चार्लींवर थेट गुन्हे शाखा आणि पोलिस आयुक्तांकडूनच नियंत्रण ठेवण्यात येत होते. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी, अवैध धंदे बंद झाले होते. सर्वसामान्यांना तत्काळ मदतही मिळत होती. त्याच धर्तीवर आता पुणे शहरात कॉप्स २४ ही संकल्पना राबवली जाणार आहे.

Web Title: New security formula for Punekars; 'Cops 24' ready for immediate help..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.