दुर्लक्षित खड्डे प्राण्यांच्या जिवावर, एकाच दिवशी अपघाताच्या दोन घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 11:38 PM2018-10-01T23:38:11+5:302018-10-01T23:39:05+5:30

प्रशासनाचा हलगर्जीपणा : दापोडी, देहूरोडला एकाच दिवशी अपघाताच्या दोन घटना

The neglected pits of beasts alive | दुर्लक्षित खड्डे प्राण्यांच्या जिवावर, एकाच दिवशी अपघाताच्या दोन घटना

दुर्लक्षित खड्डे प्राण्यांच्या जिवावर, एकाच दिवशी अपघाताच्या दोन घटना

googlenewsNext

पिंपरी : शहरात व कॅन्टोन्मेंट हद्दीत विविध कामांसाठी खोदाई करण्यात येते. मात्र, वेळीच खड्डे बुजविण्यात येत नाहीत. रस्त्याच्या बाजूला असलेले खड्डे व चर ही मुक्या प्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. देहूरोड व दापोडी भागात एका दिवशी सोमवारी म्हैस व गाय खड्ड्यात पडण्याच्या
दोन घटना घडल्या. अग्निशामकचे जवान व नागरिकांच्या मदतीने त्यांची सुखरुप सुटका झाली. मात्र, उघड्या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका असून, प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, अशी मागणी होत आहे.

नाल्याचे काम सुरू असलेल्या खड्ड्यात पडलेली म्हैस दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. ही घटना दापोडी येथील मोरया हॉस्पिटलसमोर सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. मोरया हॉस्पिटलजवळील रस्त्यालगत महापालिकेकडून नाल्याचे काम सुरू आहे. यासाठी सात फूट खोल खड्डा खोदण्यात आला असून, त्यावर कसलेही झाकण टाकलेले नव्हते. दरम्यान, या खड्ड्यात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बसंती नावाची म्हैस पडली. खड्ड्याची रुंदीही कमी असल्याने म्हैस त्यामध्ये जाम अडकून बसली. तसेच जोरजोरात ओरडू लागली. परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेत म्हशीला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. तसेच अग्निशामक दलालाही कळविले. यानंतर काही वेळातच संत तुकारामनगर व रहाटणी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. म्हशीला बाहेर काढण्यासाठी बुलडोझरची मदत घेण्यात आली. म्हशीच्या दोन्ही पायांमध्ये दोरी अडकवून बुलडोझरच्या साहाय्याने आल्हादपणे म्हशीला उचलून बाहेर काढण्यात आले. या कामासाठी नागरिकांनीही मदत केली. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर बसंती नावाची म्हैस सुखरूप खड्ड्यातून बाहेर काढण्यात यश आले. अशोक कानडे, विलास पाटील, मनोज मोरे, बबुशा गवारी, विशाल पोटे, अमोल रांजणे, राजाराम चौरे या अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न केले.

चरीत अडकलेली गाय सुखरुप
१देहूगाव : येथील देहूरोड रस्त्यावर झेंडे मळ्याजवळ कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत खड्ड्यात पडलेल्या गाईला तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर जेसीबीच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
२खासगी कंपनीने आॅप्टिक फायबर केबलसाठी खोदाई केली आहे. पण ते रस्ते बुजविले नाहीत. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. माळीनगर येथील दत्तात्रय टिळेकर यांची गाय रस्त्याच्या कडेला चरण्यासाठी गेली होती. येथील गवत तीन ते चार फूट उंच असल्याने तो चर दिसत नव्हता. ही गाय चरताना या तीन फूट रुंद व आठ फूट खोल चरामध्ये पडली.
३या चरातून बाहेर येण्यासाठी जिवाच्या आकांताने धडपड करू लागली. पण चिखलात ती अधिकच रुतून बसली. हे दृष्य पाहून मालक दत्तात्रय टिळेकर हतबल झाले.
४दरम्यान, रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली. गाई बाहेर येण्यास काहीही संधी नसल्याचे लक्षात येताच काही तरुणांनी दोर आणले व तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हा सारा प्रकार सुमारे अर्धातास चालला होता. परंतु, हा प्रयत्नही फोल ठरल्यानंतर जेसीबी आणून चराच्या बाजूने मोठा खड्डा घेण्यास सुरुवात केली़ त्यातून रस्ता करून गाईला हळवारपणे बाहेर काढण्यात आले़ त्यानंतर उपस्थित नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Web Title: The neglected pits of beasts alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.