‘एनडीए’ची पहिलीच महिला सिल्व्हर मेडलिस्ट..! श्रीती दक्षने ‘लोकमत’ला सांगितला प्रेरणादायी प्रवास
By किरण शिंदे | Updated: May 30, 2025 12:18 IST2025-05-30T12:18:42+5:302025-05-30T12:18:59+5:30
एनडीएच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला सिल्व्हर मेडल मिळाले आहे.

‘एनडीए’ची पहिलीच महिला सिल्व्हर मेडलिस्ट..! श्रीती दक्षने ‘लोकमत’ला सांगितला प्रेरणादायी प्रवास
पुणे - राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) इतिहासात यंदा पहिल्यांदाच महिला कॅडेटस् ची तुकडी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडली. या तुकडीत १७ महिला आणि ३०० हून अधिक पुरुष कॅडेट्स आहेत. यामध्ये कला शाखेत श्रिती दक्ष हिला सिल्व्हर मेडल प्रदान करण्यात आले. एनडीएच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला सिल्व्हर मेडल मिळाले आहे.
यावेळी लोकमतशी बोलतांना श्रितीने आपल्या प्रवासाबाबत सांगितले. 'मी मूळची हरयाणाची आहे. माझे शालेय शिक्षण नोएडामध्ये झाले. माझे वडील निवृत्त विंग कमांडर आहेत तर आई शिक्षिका आहे. माझी मोठी बहीण एअर फोर्समध्ये आहे. हा प्रवास सुरुवातील कठीण होता पण माझ्या कुटूंबाच्या पाठींब्यामुळे मला हिंमत मिळाली. माझ्या शिक्षकांनी सुद्धा मला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन दिले. माझ्या प्रक्षिणकाळात मला नेहमीच त्यांनी सपोर्ट केला. त्यांची मी ऋणी आहे.’
एनडीएच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला सिल्व्हर मेडल मिळालं आहे. त्यामुळेच श्रितीचे हे यश एनडीएमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी प्रेरणादायी ठरले आहे. दरम्यान, देशसेवेचा वारसा मनात ठेवून कठोर मेहनत, वेळेचे व्यवस्थापन आणि स्वतःवर विश्वास या जोरावर तिने एनडीए परीक्षेची तयारी केली. पुरुषांप्रमाणेच शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक चाचण्या पार करत तिने एनडीएमध्ये प्रवेश मिळवला. कठोर परीश्रमाच्या जोरावर ध्येय गाठल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.