'राष्ट्रवादी एकत्रीकरण', तरुण कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होणार; अंकुश काकडेंचा विरोधात सूर

By राजू इनामदार | Updated: May 12, 2025 17:19 IST2025-05-12T17:19:11+5:302025-05-12T17:19:41+5:30

काही हितसंबंधी नेते, कार्यकर्ते, ज्यांना कसलेही स्थान नाही, अशा लोकांना दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्यांच्या भविष्याची काळजी वाटते

ncp consolidation will affect the political future of young activists Ankush Kakade opposes | 'राष्ट्रवादी एकत्रीकरण', तरुण कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होणार; अंकुश काकडेंचा विरोधात सूर

'राष्ट्रवादी एकत्रीकरण', तरुण कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होणार; अंकुश काकडेंचा विरोधात सूर

पुणे: दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा शरद पवार यांच्याबरोबर राहिलेल्या तरुण कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होणार आहे, असे संदिग्ध मत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे राज्य प्रवक्ते, पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी एकत्रीकरणाच्या विरोधात सूर लावला. यासंबंधीचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना निघण्यापूर्वी व्हावा. पक्षाच्या १४ मे रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत याविषयीची आपली भूमिका मांडू असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले.

काकडे म्हणाले, ‘शरद पवार यांनी एकत्रीकरणाबाबत भाष्य केल्यानंतर यासंबंधीच्या पक्षांतर्गत चर्चा सुरू झाल्या. खासदार सुप्रिया सुळे निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. त्या काय निर्णय घेतील ते माहिती नाही, मात्र कार्यकर्ते काय म्हणतात, त्यांच्या भावना काय आहेत, वैयक्तिक मला काय वाटते, हे त्यांना सांगणे माझे कर्तव्य वाटले. त्यात मी सध्याचा पक्षाची स्थिती, अन्य पक्षांची स्थिती याबाबत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी लिहिले आहे. मी सन १९७८ पासून शरद पवार यांच्याबरोबर आहे. आताही ते घेतील तो निर्णय मान्य असणारच आहे, मात्र खासदार सुळे यांना वस्तुस्थिती काय आहे ते सांगणे महत्त्वाचे वाटले, असे ते म्हणाले.

उद्धव व राज ठाकरे यांच्या एकत्रीकरणाची ही चर्चा आहे. वेगळे होऊन त्यांना तर अनेक वर्षे झाली. अजित पवार, सुळे यांना वेगळे होऊन फक्त अडीच-तीन वर्षे झाली आहेत, त्यामुळे या चर्चा होत असतात. काही हितसंबंधी नेते, कार्यकर्ते, ज्यांना कसलेही स्थान नाही, अशा लोकांना दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्यांच्या भविष्याची काळजी वाटते. तेच काहीतरी बोलत असतात, असे काकडे म्हणाले.

Web Title: ncp consolidation will affect the political future of young activists Ankush Kakade opposes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.