शरद पवार यांना देण्यास ताजा भाजीपाला ; तो शेतकरीपुत्र २०० किलोमीटर आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 19:29 IST2019-11-22T19:04:12+5:302019-11-22T19:29:11+5:30
आपल्या लाडक्या नेत्याला 'ताजा भाजीपाला' मिळावा म्हणून २०० किलोमीटर अंतर दुचाकीवरून पार करणारा कार्यकर्ता समोर आला आहे. यातील नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कार्यकर्ता आहे सुनील सुक्रे.

शरद पवार यांना देण्यास ताजा भाजीपाला ; तो शेतकरीपुत्र २०० किलोमीटर आला
पुणे : नेते आणि कार्यकर्ते यांचे नाते अनेकदा रक्ताच्या नात्या पलीकडे असते. नेत्याच्या एका इशाऱ्यावर एका कृती करणारे आणि त्यांनी आवाहन केल्यावर क्षणात तीच कृती थांबणारे कार्यकर्ते सगळ्या देशाने बघितले आहेत. पण त्याही पलीकडे जाऊन आपल्या लाडक्या नेत्याला 'ताजा भाजीपाला' मिळावा म्हणून २०० किलोमीटर अंतर दुचाकीवरून पार करणारा कार्यकर्ता समोर आला आहे. यातील नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कार्यकर्ता आहे सुनील सुक्रे.
पुण्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर गावचे सुक्रे यांनी पवार यांना भाजीपाला देण्यासाठी त्यांचे मुंबईतील 'सिल्व्हर ओक' निवासस्थान गाठले आणि इतक्या राजकीय घडामोडींच्या गडबडीतही पवारही या शेतकरी पुत्राला आवर्जून भेटले. इतकेच नव्हे तर त्यांनी सोशल मीडियावर फोटोही शेअर केला आहे.
याबाबत सुनील सुक्रे लोकमतशी बोलताना म्हणाले, 'पवार कायम शेतकऱ्यांसाठी उभे असतात. शेतकऱ्याला गरज असते तेव्हा बांधावर जाणारे पवार हे पहिले नेते असतात. त्यामुळेच शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेली ताजी भाजी दयायची त्यांना का नाही द्यायची याच विचारातून मी शुक्रवारी (दि.२२) रोजी पहाटे चार वाजता उठलो. दोन पिशव्यांमध्ये शेपू, मेथी, गावरान बोरं, कारली, कोथिंबीर एकत्र केली आणि पाच वाजता घरातून निघालो. सलग प्रवास केल्यावर दुपारी दीड वाजता मुंबईला पोहोचलो. तिथे सुरक्षारक्षकांनी मला अडवले, पण मी त्यांना पवार यांना भाजी दयायची आहे असं सांगितलं. त्यावर त्यांनी आत फोन करून ही माहिती दिली आणि पवार यांनी मला सोडण्यास सांगितले. मी आत गेल्यावर सुरुवातीला मला जितेंद्र आव्हाड भेटले. त्यांनी माझी आपुलकीने 'कुठून आलो, कसा आलो' वगैरे चौकशी केली आणि मग मला पवार भेटले. इतक्या गडबडीतही त्यांनी माझी दखल घेतली याचे मला समाधान आहे. इतक्या लांबून आलो म्हटल्यावर त्यांनीही माझी विचारपूस केली. त्यांच्या भेटीने मी भारावून गेलो. ते मला नाहीत तर एका शेतकरी पुत्राला भेटले आणि त्यांच्या या धोरणामुळेच आम्ही त्यांना 'शेतकऱ्यांनाचा अभिमान' म्हणतो.
दरम्यान सुक्रे हे स्वतः शेतकरी आहेत. त्यांच्या शेतात सव्वा एकर कांदा पीक आहे. तर दुसऱ्याचे अडीच एकर शेत कसण्यासाठी त्यांनी वाट्यावर घेतले आहे. त्यांच्या घरी आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलं असा परिवार आहे.