Navale Bridge Accident : उपाययोजना कुचकामी ठरतायत का? अपघातांना जबाबदार कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 20:48 IST2025-11-15T20:41:35+5:302025-11-15T20:48:02+5:30
- महामार्गावरील वाढत्या दुर्घटनांसाठी जबाबदार कोण आणि राबवलेल्या उपाययोजना अयशस्वी का ठरत आहेत?, याची चौकशी केंद्र सरकारने तातडीने करावी, अशी मागणी त्यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

Navale Bridge Accident : उपाययोजना कुचकामी ठरतायत का? अपघातांना जबाबदार कोण?
पुणे :पुणे-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील गंभीर अपघातांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी झालेल्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) राबवलेल्या उपाययोजनांचा कुचकामीपणा पुन्हा एकदा उघड झाला असून, या उपाययोजनांवर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केला आहे. महामार्गावरील वाढत्या दुर्घटनांसाठी जबाबदार कोण आणि राबवलेल्या उपाययोजना अयशस्वी का ठरत आहेत?, याची चौकशी केंद्र सरकारने तातडीने करावी, अशी मागणी त्यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
पाटील यांनी सांगितले की, नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल या मार्गावर अपघात रोखण्यासाठी वेगमर्यादा ताशी ६० वरून ४० किमीपर्यंत कमी करण्यासह वाहतूक तपासणी चौकी, पोलिसांची तैनात, गस्त वाहने आणि अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात या चौक्यांवर मनुष्यबळ नसणे, अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आणि महामार्गावर कोणती ही शिस्तबद्ध देखरेख नसल्यामुळे उपाययोजना कागदोपत्रीच राहिल्याचे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
एनएचएआयकडून उपाययोजनांनंतर अपघातांची संख्या ६४ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा करण्यात आला होता; परंतु प्रत्यक्षात अपघात थांबलेले नाहीत, हे गुरुवारी झालेल्या दुर्घटनेवरून सिद्ध होते, असे पाटील म्हणाले. महामार्गावरील निष्काळजीपणा, अपुरे पथ सुरक्षा उपाय आणि ढिसाळ अंमलबजावणीमुळे जनजीवन धोक्यात येत असून, या परिस्थितीची गंभीर दखल घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.