Navale ridge accident : अपघात टाळण्याच्या उपाय योजनांचा अहवाल महिनाभरात द्या; मोहोळ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 20:12 IST2025-11-15T20:07:55+5:302025-11-15T20:12:14+5:30
- वेगमर्यादा आणि सेवा रस्त्यांच्या कामातील भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावा, तसेच याबाबत महिनाभरात अहवाल सादर करा’, अशा सूचना केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली.

Navale ridge accident : अपघात टाळण्याच्या उपाय योजनांचा अहवाल महिनाभरात द्या; मोहोळ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
पुणे : ‘नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी वाहतूक विषयक सुधारणा, वेगमर्यादा आणि सेवा रस्त्यांच्या कामातील भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावा, तसेच याबाबत महिनाभरात अहवाल सादर करा’, अशा सूचना केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली.
नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी शनिवारी शासकीय विश्रामगृहात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त (पीएमआरडीए) डाॅ. योगेश म्हसे, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, राज्य महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मोहोळ म्हणाले, ‘अपघात टाळण्यासाठी नियोजित नऱ्हे ते रावेत दरम्यानचा उन्नत मार्ग, जांभुळवाडी ते वारजे परिसरापर्यंत वर्तुळाकर मार्ग नियोजित असून याचे काम प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. भरधाव वेगाच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी स्पीड गनची संख्या वाढविण्यात येणार आहे. स्वामी नारायण मंदिर ते नवले पूल दरम्यान तीव्र उतारावर वेग कमी करण्याबाबत उपाययोजना, जड वाहनांसाठी वेगमर्यादा प्रतितास ६० किलोमीटरवरुन ३० किलोमीटर, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई आदी उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच ‘भूसंपादनामुळे बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्यांचे काम रखडले आहे. पाषाण भागात संरक्षण विभागाची जागा आहे. सेवा रस्त्यासाठी संरक्षण विभागाची जागा मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. सेवा रस्त्यावर पीएमपी बस, तसेच खासगी वाहतूकदारांचे थांबे आहेत. हे थांबे बेकायदा आहेत. तसेच सेवा रस्त्यावर अतिक्रमणे आहेत. यावर कारवाई करावी’, असे आदेश दिले असून अपघात रोखण्यासाठी केलेल्या कामाचा अहवाल महिनाभरात सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबतचा आढावा डिसेंबर महिन्यात घेणार असल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले.
स्थानिक निवडणुकीचा महायुतीवर परिणाम नाही -
‘पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार आणि शरद पवार) एकत्र येणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे’, याबाबत विचारले असता मोहोळ म्हणाले, ’स्थानिक स्वराज्य संस्थेतील युती, आघाडीचा महायुतीवर परिणाम होणर नाही. या निवडणुकांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेतल्या जातात.’