अपघातांची मालिका सुरूच; नवले पूल परिसरात अपघातात तरुणाचा मृत्यू, तरुणी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 19:23 IST2026-02-14T19:22:44+5:302026-02-14T19:23:36+5:30
प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले.

अपघातांची मालिका सुरूच; नवले पूल परिसरात अपघातात तरुणाचा मृत्यू, तरुणी गंभीर जखमी
धनकवडी ( पुणे ) : नवले पूल परिसरात प्रवासी आराम बसच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १२ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी मैत्रीण जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मृत तरुणाचे नाव नितीन जुनवणे (१९) असून तो धायरी फाटा येथील रहिवासी होता. दोघेही महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कसा घडला अपघात?
पोलिसांच्या माहितीनुसार, १२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास नितीन आणि त्याची मैत्रीण कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्ग मार्गावरून कात्रजकडे जात होते. त्यावेळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. नितीनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
बस चालक फरार
अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. जखमी तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम करत आहेत.
नागरिकांमध्ये संताप
नवले पूल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून या ठिकाणी वाहतूक नियंत्रण, वेगमर्यादा आणि सीसीटीव्ही देखरेख वाढवण्याची मागणी केली आहे.