Navale Bridge Accident : नवले पुलावरील अपघातात चिखलीतील तरुणाचा मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 19:34 IST2025-11-14T19:32:01+5:302025-11-14T19:34:05+5:30
- अडीच महिन्यांच्या चिमुकल्याचे पित्रृछत्र हरपले, वृद्ध आई-वडील, पत्नी शोकात, आधारस्तंभ हरवल्याने कुटुंब हतबल

Navale Bridge Accident : नवले पुलावरील अपघातात चिखलीतील तरुणाचा मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
-रामहरी केदार
चिखली : पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण वाहन अपघातात अवघ्या तीस वर्षांच्या धनंजय कुमार कोळी या तरुणाचा मृत्यू झाला. धनंजय हे मूळचे जयसिंगपूर जि.कोल्हापूर येथील रहिवासी होते. ते सध्या चिखली येथील दुर्गानगर परिसरात राहत असून, व्यवसायाने कार चालक होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
गेल्या पाच वर्षांपासून धनंजय आपल्या आई-वडिलांसह चिखली येथे स्थायिक झाले होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी कार चालकाचा व्यवसाय स्वीकारला होता. गुरुवारी धायरीतील त्यांचे परिचित नवलकर कुटुंब देवदर्शनासाठी नारायणपूरला जाणार होते. ओळखीच्या व्यक्तीची गाडी घेऊन जाण्यासाठी धनंजय यांना विनंती करण्यात आली. देवदर्शन करून परत येत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं. या भीषण अपघातात धनंजय यांच्यासह मोक्षिता रेड्डी, स्वाती नवलकर, दत्तात्रय दाभाडे आणि शांता दाभाडे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
निर्दोष जीवांचा करुण अंत
या अपघातात मोक्षिता रेड्डी ही अवघ्या तीन वर्षांची चिमुरडीही मृत्यू झाला. नवलकर कुटुंब तिला देवदर्शनासाठी सोबत घेऊन गेले होते. निरागस वयातील या चिमुरडीचा करुण अंत सर्वांना हळहळून टाकणारा ठरला. धनंजय यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अवघा अडीच महिन्यांच्या मुलाचे पितृछत्र हरपले आहे, ही तर आणखी वेदनादायी बाब
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
धनंजय यांच्या निधनाने त्यांच्या ६१ वर्षीय वडिलांवर आणि ५२ वर्षीय आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील आधारस्तंभ हरवल्याने कुटुंब हतबल झाले आहे. धनंजय यांच्यापश्चात पत्नी, अडीच महिन्यांचा मुलगा, आई-वडील असा परिवार आहे, तसेच त्यांच्या दोन विवाहित बहिणी भावाच्या प्रेमाला मुकल्याने संपूर्ण कुटुंब शोकात बुडाले आहे.