Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ विचित्र अपघात; २ जण जखमी, ७ वाहनांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 14:42 IST2022-03-07T14:42:38+5:302022-03-07T14:42:47+5:30
अपघातांची मालिका सुरूच असून वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांचा संताप अनावर

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ विचित्र अपघात; २ जण जखमी, ७ वाहनांचे नुकसान
धायरी : नवले पुल परिसरात आज सोमवारी झालेल्या विचित्र अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. सिमेंट घेऊन निघालेल्या ट्रकने समोर सिग्नलला उभ्या असणाऱ्या चारचाकी वाहनाला जोराची धडक दिली. त्यामुळे समोर असणाऱ्या इतर वाहनांना ही यात जोराची धडक बसली आहे. ही घटना सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली
मिळालेली माहिती अशी की, कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने निघालेला ट्रक यावरील चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर सिग्नलला उभ्या असणाऱ्या चार चाकी वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. यात पाच चारचाकी वाहने व दोन दुचाकींचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एका चार चाकी वाहनाचे व रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुचाकी चालक जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मुख्य रस्त्यावर अपघात झाल्याने थोड्या वेळाकरिता वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी तत्काळ अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहेत.