बिहारच्या महिलांच्या खात्यात मोदींकडून १० हजार, मग महाराष्ट्राला मदत का नाही? ठाकरेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 16:02 IST2025-10-04T16:01:10+5:302025-10-04T16:02:32+5:30
महाराष्ट्राला मदत करायची असेल तर मराठवाड्यातील लाडक्या बहिणींना एकत्रितपणे सहा हफ्ते मदत म्हणून द्यावी

बिहारच्या महिलांच्या खात्यात मोदींकडून १० हजार, मग महाराष्ट्राला मदत का नाही? ठाकरेंचा सवाल
पुणे : मराठवाड्यात पूरस्थिती गंभीर आहे, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना, लोकांना मदतीची गरज आहे. बिहारच्या महिलांच्या खात्यात मोदींनी १० हजार रुपये टाकले. त्या ठिकाणी निवडणुका आहेत. म्हणून त्यांनी हे केलं. मग महाराष्ट्राला मदत का केली जात नाही असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्राला मदत करायची असेल तर मराठवाड्यातील लाडक्या बहिणींना एकत्रितपणे सहा हफ्ते मदत म्हणून द्यावी अशी मागणी त्यांनी पुण्यात कार्यक्रमात केली आहे. वसंत मोरे यांच्या वतीने अजित नागरिक पतसंस्था महिला बचत गट कर्जदार महिला भगिनींना कर्जमुक्ती प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम व महिला भगिनींच्या वतीने कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते
ठाकरे म्हणाले, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्याने मोदी येऊन काहीतरी घोषणा करतील. बिहारमध्ये निवडणुका असल्याने मोदींनी तिथल्या महिलाच्या खात्यात 10 हजार रुपये दिले. आता मराठवाड्यातील लाडक्या बहिणींना एकत्रितपण सहा हफ्ते मदत म्हणून द्यावी. ज्या परिस्थितीत मराठवाड्यातील शेतकरी संपत आहे, त्या वेळी त्यांना मदत करणे आवश्यक आहे. विधानसभेच्या आधी लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या खात्यात दोन-तीन महिन्यांचे हफ्ते देण्यात आले. मग आता सहा महिन्यांचे हफ्त एकत्र द्या, आता पूरस्थितीमध्ये बहिणींना गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
शेतकरी कधीच कर्ज काढून पळून जात नाही
आपल्या देशातील उद्योगपतींनी हजारो कोटींचं कर्ज काढले व न फेडता ते पळून गेले. या उद्योगपतीचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. पण शेतकरी कधीच कर्ज काढून पळून जात नाही. ज्यावेळी आपण काढलेले कर्ज फेडू शकत नाही असं वाटल्यावर तो आत्महत्या करतो. अशा शेतकऱ्यांचे कर्ज मात्र माफ केलं जात नसल्याची टीका ठाकरे यांनी सरकारवर केली आहे.
वसंत मोरेंप्रमाणे सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून जा
उद्धव ठाकरेंनी भाषणात वसंत मोरे यांचे भरभरून कौतुक केले. ज्या ठिकाणी अन्याय होतो. त्या ठिकाणी वसंत तात्या हातात बांबू घेऊन जायचे आणि न्याय मिळवून द्यायचे. मुख्यमंत्री आला तरी नको, पण वसंत मोरे आले तर लोकांना आपलेपणा वाटायचा. त्यांना न्याय मिळण्याची शाश्वती वाटायची. ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी शिवसैनिकांनी मदत करावी, सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून जावे असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.