पुरातन पुण्याचा पवित्र वारसा नागेश्वर महादेव मंदिर; लाकडी सभामंडप दगडी गर्भगृह, ५०० वर्षांचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:19 IST2025-07-25T13:14:08+5:302025-07-25T13:19:24+5:30

पर्वतीचे कामही या मंदिरानंतर ५०० वर्षांनी झालेले आहे, यावरून जुन्या काळातही पुणे कसे धार्मिक त्याचबरोबर कलारसिक शहर होते हे लक्षात येते

Nageshwar Mahadev Temple the sacred heritage of ancient Pune wooden assembly hall, stone sanctum sanctorum, 500 years of history | पुरातन पुण्याचा पवित्र वारसा नागेश्वर महादेव मंदिर; लाकडी सभामंडप दगडी गर्भगृह, ५०० वर्षांचा इतिहास

पुरातन पुण्याचा पवित्र वारसा नागेश्वर महादेव मंदिर; लाकडी सभामंडप दगडी गर्भगृह, ५०० वर्षांचा इतिहास

पुणे: सोमवार पेठेतील नागेश्वर महादेव मंदिर म्हणजे पुरातन पुण्याची धार्मिक ओळख. महापालिकेच्या निधीतून जीर्णोद्धार करण्यात आलेले राज्यातील हे पहिलेच मंदिर. सगळे काम पूर्वी होते तसेच झाले. त्यामुळेच भाविकांनी मंदिर पुन्हा एकदा पूर्वीसारखेच गजबजू लागले आहे. पुरातन पुण्याचा पौराणिक वारसा जसा होता तसाच झाला आहे.

महापालिकेचे तत्कालीन स्थानिक पदाधिकारी गणेश बीडकर, हेरिटेज विभागाचे प्रमुख अभियंता असलेले श्याम ढवळे यांच्या प्रयत्नांमधून या मंदिराचा जीर्णोद्धार साधला गेला. जुने दगडी बांधकाम, त्यावरचे कोरीव काम, लाकडी सभामंडप, त्यावरच्या महिरपी, उठाव शिल्पे हे सगळे जसेच्या तसे उभे करणे आव्हानात्मक होते. जुना सभामंडप कलला होता. दगडी चिरे ढासळले होते, काही ढासळण्याच्या बेतात होते. हे सगळे आव्हान ढवळे, बिडकर यांनी पेलले. मंदिर जुने असल्याने भारतीय पुरातत्व विभागाच्या वारसा स्थळांच्या यादीत होते. त्यांच्याकडून तिथे काम करण्याची परवानगी मिळवणे यातच ७ वर्षे गेली असे बिडकर सांगतात. मात्र एकदा परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी जुने काही कारागीर, नवे तंत्रज्ञान यातून मंदिराचा जीर्णोद्धार साध्य केला.

मंदिराचे पूजाअर्चा सप्तर्षी घराण्याकडे आहे. कधीपासून तर तब्बल १८ पिढ्या सप्तर्षी घराणे हे काम पहात आहेत. सध्या ही जबाबदारी असलेले तेजस हे १८व्या पिढीचे वारसदार. पहाटेच्या पूजेपासून ते शेजारतीपर्यंत दररोजची पूजाअर्चा नियमितपणे केली जाते. शिवरात्र, श्रावण महिन्यातील सर्व महत्त्वाच्या पूजा उत्सव पार पाडले जातात. कलात्मकता हे या मंदिराचे अनोखे वैशिष्ट्य आहे. पर्वतीचे कामही या मंदिरानंतर ५०० वर्षांनी झालेले आहे, यावरून जुन्या काळातही पुणे कसे धार्मिक त्याचबरोबर कलारसिक शहर होते हे लक्षात येते.

शंकराची बहुतेक मंदिरे नदीकाठी असतात. हेच कसे नदीपासून इतके लांब विचारल्यावर कळाले की हेही नदीकाठीच होते. मंदिरात एक तीर्थकुंड होते. त्यातून पाणी येत असते. त्याचे नाव होते नागतीर्थ. कुंड पाण्याने भरले की तिथून पाणी वाहत वाहत जवळच असणाऱ्या एका झऱ्याला मिळायचे व तिथून पुढे जायचे. त्यातून त्या झऱ्याचे नाव नागझरा असे झाले. साधू, संन्याशांच्या अशा अनेक कथा, दंतकथा मंदिराशी संबंधित आहे. या परिसराचे नावच मुळी नागेश पेठ असे होते. पुढे ते सोमवार पेठ असे झाल्याचे सांगितले जाते.

फक्त सोमवार पेठेचेच नव्हे तर संपूर्ण पुण्याचेच धार्मिक वैभव असलेले हे मंदिर, पडझडीच्या अवस्थेत होते. एक सामाजिक, राजकीय कार्यकर्ता म्हणून मला ती स्थिती पहावत नव्हती. त्यामुळेच पुरातत्व खात्याबरोबर भांडून आम्ही काही सहकाऱ्यांनी तिथे काम करण्याची परवानगी मिळवली. महापालिकेच्या माध्यमातून निधी उभा केला. नगरसेवक विकास निधीचा वापर केला. अभियंता ढवळे व तत्कालीन महापालिका अधिकाऱ्यांची चांगली साथ मिळाली व मंदिराचे सगळे काम व्यवस्थित झाले.- गणेश बिडकर, तत्कालीन स्थानिक नगरसेवक

Web Title: Nageshwar Mahadev Temple the sacred heritage of ancient Pune wooden assembly hall, stone sanctum sanctorum, 500 years of history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.