Pimpri Chinchwad: मोशीतील ‘त्या’ तरुणाच्या मृत्यूचे गूढ उलगडले; तीन मित्रांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 13:18 IST2023-07-04T13:17:40+5:302023-07-04T13:18:42+5:30
याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली...

Pimpri Chinchwad: मोशीतील ‘त्या’ तरुणाच्या मृत्यूचे गूढ उलगडले; तीन मित्रांना अटक
पिंपरी : पाचव्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाला होता. मात्र, ती आत्महत्या नसून त्याला उडी मारण्यास त्याच्याच मित्रांनी भाग पाडल्याचे पोलिस तपासात समोर आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. तुपे वस्ती, मोशी येथे २१ मे २०२३ रोजी हा प्रकार घडला.
सागर दत्तात्रय गाढवे (वय २९, रा. चिखली), सुहास गयाभाऊ गाढवे (वय २३, रा. चिखली) व मंगेश जालिंदर वाळुंज (वय २६, रा. चिखली), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिथिलेश लंगोटे असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथिलेश हा तुपे वस्ती येथील कॉसमॉस सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला, असे समजून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नेंद केली. मात्र, तपास करत असताना धक्कादायक प्रकार समोर आला.
मिथिलेश हा आरोपींसोबत कॉसमॉस सोसायटीच्या फ्लॅटमध्ये दारू पीत बसला होता. यावेळी त्यांच्यात भांडण झाले. यावेळी आरोपींनी मिथिलेश याला मारहाण केली. त्यावेळी वाचण्यासाठी मिथिलेश तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, आरोपींनी त्याला जाऊ दिले नाही. यावेळी मिथिलेश हा फ्लॅटच्या गॅलरीतून शेजारच्या फ्लॅटच्या गॅलरीत जाण्याचा प्रयत्न करत असताना पाचव्या मजल्यावरून खाली पडला. यात गंभीर जखमी होऊन मिथिलेश याचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.