'My father raised a party with blood', supriya sule | ‘माझ्या बापानं रक्ताचं पाणी करून पक्ष उभारलाय’

‘माझ्या बापानं रक्ताचं पाणी करून पक्ष उभारलाय’

पैठण : येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद मेळाव्यात संजय वाघचौरे आणि माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरच बाचाबाची झाली. यावेळी संतप्त झालेल्या खा. सुळे यांनी ‘माझ्या बापानं रक्ताचं पाणी करून पक्ष उभारलाय, त्याला गालबोट लावाल, तर गाठ माझ्याशी’, अशा शब्दांत सर्वांना ठणकावले. पैठण येथील माहेश्वरी भवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पैठण तालुका संपर्क गोर्डे यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते.

मेळावा सुरू झाल्यानंतर विधानसभा सभा निवडणुकीत माजी आ. संजय वाघचौरे यांचे तिकीट कापल्यावरून त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. यावेळी दत्ता गोर्डे यांच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी केली. हा गोंधळ वाढत जाऊन कार्यकर्त्यांमध्ये मेळाव्यातच बाचाबाची झाली. समजावून सांगूनही कुणीच ऐकत नव्हते. यावेळी संतापलेल्या खा. सुळे यांनी कार्यकर्त्यांना शांत करताना कडक भाषेत समज दिली. ‘माझ्या बापाने रक्ताचे पाणी करून हा पक्ष वाढवला आहे. याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवावे. पक्षाला गालबोट लावणाऱ्याला माफ करणार नाही. ही हुल्लडबाजी मी पहिल्यांदा पाहिली आहे. हे मी खपवून घेणार नाही. मी कुणाची लेक आहे, हे लक्षात घ्या. माझ्या बैठकीत पहिल्यांदा असा गोंधळ झाला असून, ही बैठक माझ्यासाठी कायम कटू आठवणीत राहील, असा सनसनीत टोलाही, त्यांनी गोंधळ घालणाऱ्यांना दिला.

सर्वांचे केस पांढरे झाले आहेत, तरीही...
बैठकीत हुल्लडबाजी करणाºया कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे मायेने, ममतेने समजावून सांगत होत्या. आपण मोठे झालो आहोत, मॅच्युअर झालो आहोत. हुल्लडबाजी आपल्याला शोभत नाही. नवीन कार्यकर्ता असा वागला तर समजू शकतो. हुल्लडबाजी करणारे मॅच्युअर आहेत. सर्वांचे केस पांढरे झाले आहेत. मात्र, गोदरेजने ते रंगविल्याचे दिसते, ती गोदरेजची जवानी आहे, असे म्हणून कार्यकर्त्यांत हास्यरंगही सुप्रिया सुळे यांनी भरला.

Web Title: 'My father raised a party with blood', supriya sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.