"माझी बारामती बाराचीच आहे", अजित पवार बोलले वेगळं, लोकांनी अर्थ काढला भलताच; काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 19:30 IST2026-01-19T19:22:18+5:302026-01-19T19:30:40+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार पंचायत समिती निवडणुकीबद्दल बोलत होते. भाषण करत असताना अजित पवार आकडेवारी सांगत होते, त्याचा वेगळाच अर्थ लावत उपस्थितांनी लावला. त्यानंतर अजित पवारांनाही हसू आवरले नाही.

"माझी बारामती बाराचीच आहे", अजित पवार बोलले वेगळं, लोकांनी अर्थ काढला भलताच; काय घडलं?
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्यापार्श्वभूमीवर पक्ष बळकट करण्यावर भर दिला जात असून, भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनाच अजित पवारांनी पक्षात प्रवेश दिला. या प्रवेशावेळी अजित पवार पंचायत समित्यांचं गणित सांगत होते. त्यातच त्यांनी एक विधान केले, जे ऐकून सगळ्यांनाच हसू अनावर झाले. अजित पवारांनीही त्यावर हसत हसत खुलासा केला.
महापालिका निवडणुकीत निराशाजनक कामगिरी राहिल्यानंतर अजित पवारांनी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. भाजपाचे पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. यावेळी अजित पवार बोलत होते.
अजित पवारांनी भाजपाला सुनावले
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "शरद बुट्टे पाटील आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खरंतर ही त्याची घरवापसी आहे, असे मी स्वतः समजतो. कारण पक्षाच्या स्थापनेपासूनचा जुना कार्यकर्ता आहे. जसे आम्ही चांगले कार्यकर्ते निर्माण करतो, इतर पक्ष पण चांगल्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात आणि शरदला पण इतर पक्षाने बोलावलं. त्याचा फायदा जेवढा घेता येईल, तेवढा त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला", असे म्हणत अजित पवारांनी भाजपाला अप्रत्यक्षपणे खडेबोल सुनावले.
"१९९१ ला मला खासदारकीचे तिकीट दिले. तुमचा विश्वास बसणार नाही. त्यावेळी मी साडेतीन लाख रुपयांमध्ये खासदार झालो होतो. माझा खर्च होता तीन लाख ५० हजार. आता तर जेवणाला तीन लाख ५० हजार पुरत नाहीये. काय बोलायचे. लोकसभेला. त्या गोष्टीला ३५ वर्षे झाली. असे सगळे चित्र बदलत गेले आहे", असा अनुभव अजित पवारांनी सांगितले.
बारामती पंचायत समितीबद्दल काय बोलले?
"आपले ७३ जिल्हा परिषद सदस्य आहेत. आपल्या १३ पंचायत समित्या आहेत. सगळ्यात मोठी पंचायत समिती माझी राजगुरूनगर-खेडची आहे, सोळाची (सदस्य). तशीच आमची जुन्नरची आहे, सोळाची . मला वाटतं इंदापूरची बहुतेक सोळाची आहे. माझी बारामतीची बाराचीच आहे. (या विधानानंतर उपस्थित सगळे हसले) बाराचा अर्थ आता बराच काही निघतो. आता तुम्ही हसताय. बारामतीची बाराचीच राहणार ना?", असे अजित पवार हसत हसत म्हणाले.
खेड आळंदीच्या आमदाराला टोला
"आताचे तुमचे आमदार मला येऊन एवढे गोड-गोड बोलतात, पण मी म्हटलं की अरे नुसते गोड बोलून चालणार नाही. शेवटी काम पण झाले पाहिजे. आता काही आमदारकीची निवडणूक नाही. त्यामुळे मी काही टीका टिप्पणी करू इच्छित नाही. पण, पक्षाची स्थापना झाल्यापासून खेड तालुक्यात आणि राजगुरूनगर परिसराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी ताकद दिली, प्रेम दिले", असे अजित पवार म्हणाले.