लोकसभा विधानसभेला माझं वय चालतं; मग ‘माळेगाव’च्या निवडणुकीत का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:47 IST2025-06-17T18:46:14+5:302025-06-17T18:47:54+5:30

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझं वय का चालत नाही? असा टोला ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.

My age is good enough for the Lok Sabha elections; then why not for the 'Malegaon' elections? | लोकसभा विधानसभेला माझं वय चालतं; मग ‘माळेगाव’च्या निवडणुकीत का नाही?

लोकसभा विधानसभेला माझं वय चालतं; मग ‘माळेगाव’च्या निवडणुकीत का नाही?

माळेगाव : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मदत करताना माझं वय चालतं; मग माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझं वय का चालत नाही? असा टोला ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.

माळेगावच्या निवडणुकीत चंद्रराव तावरे यांच्या वयाचा मुद्दा उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर माळेगाव येथे रंजन तावरे, ॲड. शाम कोकरे यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना हा टोला लगावला. तावरे म्हणाले, अजित पवार कारखान्याच्या परीक्षेत नापास होणार आहेत. मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील दुर्घटनेत चौघाजणांचे दुःखदायक बळी गेले. संपूर्ण महाराष्ट्र या दुःखदायक घटनेने हळहळला आहे, झालेल्या दुःखद घटनेचा शोक व्यक्त होत आहे. मात्र अजित पवार स्वतः या ठिकाणी गेले नाहीत, त्यांच्याकडे कसलीही नैतिकता आणि संवेदनशीलता राहिलेली नाही. या दुःखदायक घटनेच्या ठिकाणी भेट द्यावी, नागरिकांना आधार द्यावा, त्यांच्याशी हितगुज करावे, असे अजित पवार यांना वाटले नसल्याची टीका तावरे यांनी केली.

अजित पवार यांचे सर्व कुटुंब - आजोबा, वडील व चुलते अनेक वर्षे छत्रपती कारखान्यात संचालक व कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत होते. त्यांच्या अधिपत्याखाली कारखान्याचा कारभार चालत होता. तो कारखाना कर्जबाजारी करण्याचे पाप त्यांनी केले. यांना छत्रपती कारखाना वाचवता आला नाही, तो प्रचंड कर्जबाजारी केला. अजित पवार यांनी त्यांच्या ताब्यातील अनेक संस्थांच्या कामगारांना दमदाटी, दहशतीने माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात उतरवले. विरोधक म्हणतात, ‘मी हट्टी आहे.’ मी हट्ट केल्यानेच माळेगाव कारखान्याला को-जन, डिस्टिलरी, इंजिनिअरिंग कॉलेज, मंगल कार्यालय, इंग्लिश मीडियम व इथेनॉल प्रकल्प झाले. त्यांनी केलेला हट्टीपणाचा आरोप मला मान्य आहे. माझ्या हट्टीपणामुळेच सभासदांच्या आयुष्यात चांगले दिवस आले. त्यांच्या खिशात चार पैसे जास्त आले. सभासदांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. होय, मी हट्टी असल्याचे तावरे म्हणाले.

 

Web Title: My age is good enough for the Lok Sabha elections; then why not for the 'Malegaon' elections?