पुण्यात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा खून; पुणे पोलीस मात्र पोलीस चौकीच्या उदघाटनात व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 04:06 PM2022-05-25T16:06:05+5:302022-05-25T16:06:12+5:30

घटनेला आता 18 तासाहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही आरोपी मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत

Murder of police officer son in Pune Pune police however is busy inaugurating the police station | पुण्यात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा खून; पुणे पोलीस मात्र पोलीस चौकीच्या उदघाटनात व्यस्त

पुण्यात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा खून; पुणे पोलीस मात्र पोलीस चौकीच्या उदघाटनात व्यस्त

googlenewsNext

पुणे : पुण्याच्या हडपसर परिसरात एका पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाचा निर्घृण खून करण्यात आलाय. या घटनेला आता 18 तासाहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही आरोपी मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. मात्र असं असतानाही ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली तेथील वरिष्ठ अधिकारी हे उद्या होणाऱ्या एका पोलीस चौकीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खुनासारख्या गंभीर गुन्ह्याकडेही पुणे पोलीस किती गांभीर्याने पाहतात हेच या घटनेवरून दिसून येते. 

गिरीधर उत्रेश्वर गायकवाड (वय २१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री त्याचा खून करण्यात आला. गिरीधर याचा भाऊ निखिलकुमार याने तक्रार दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तरुणीसह पाच जणांवर खून केल्याप्रकरणी संशय व्यक्त केला जातोय.

मिळालेल्या माहितीनुसार,  मयत गिरीधर याचे वडिल उत्रेश्वर गायकवाड हे अमरावती मध्यवर्ती कारागृहात जेलर म्हणून काम पाहतात. गिरीधर ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतो त्याच महाविद्यालयात एक तरुणी देखील आहे. ही तरुणी विवाहित आहे. दरम्यान गिरीधरसोबत बोललेले तिच्या पतीला पटत नव्हते. याच वादातून मंगळवारी रात्री त्या तरुणीने फोन करून गिरीधरला ग्लायडिंग सेंटर येथे बोलावले. त्या ठिकाणी त्यांच्यात वाद झाला आणि चाकूचे वार करून गिरधर याचा खून करण्यात आला. खून केल्यानंतर आरोपी मात्र पसार झाले. 

दरम्यान पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाचा खून झाल्यानंतर पुणे शहरात खळबळ उडाली. या घटनेला आता अठरा तासाचा कालावधी उलटला तरीही आरोपी मात्र अद्यापही मोकाट आहेत. ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला येथील वरिष्ठ अधिकारी मात्र उद्या होणार्‍या एका पोलीस चौकीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. लोकमतच्या प्रतिनिधीने याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी दुसऱ्या अधिकार्‍याचे नाव सांगून त्यांच्याकडे विचारणा करा असे सांगितले. तर त्या दुसऱ्या अधिकाऱ्याने पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच बोट दाखवले. 

त्यामुळे खुनासारखा गंभीर प्रकार घडल्यानंतर ही हडपसर पोलिस स्टेशनचे अधिकारी मात्र एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. घडलेल्या प्रकाराविषयी माहिती मात्र कुणीही देण्यासाठी तयार नाही. त्यामुळे खुनासारख्या गंभीर गुन्ह्याकडेही पोलीस किती सहजतेने पाहत आहेत हेच या घटनेवरून दिसून येते.

Web Title: Murder of police officer son in Pune Pune police however is busy inaugurating the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.