दागिन्यांसाठी मातीत तोंड दाबून वृद्ध महिलेचा खून; मंचरमधील संतापजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 13:09 IST2023-05-10T12:55:07+5:302023-05-10T13:09:55+5:30
ज्येष्ठ महिलेची मुले कामानिमित्त मुंबईत राहत असल्याने त्या घरी एकट्याच राहत होत्या

दागिन्यांसाठी मातीत तोंड दाबून वृद्ध महिलेचा खून; मंचरमधील संतापजनक घटना
मंचर : वृद्धेच्या अंगावरील दागिने लुटून तोंड मातीत दाबून तिचा खून केल्याची घटना मंचर येथील पांढरीमळा वस्तीवर घडली आहे. अंजनाबाई प्रभाकर बाणखेले (वय ७८) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे.
पांढरीमळा मंचर येथे अंजनाबाई प्रभाकर बाणखेले या घरी एकट्याच राहतात. त्यांना तीन मुले व तीन मुली असून, मुले कामानिमित्त मुंबई येथे राहतात. एक परिचयाचा कामगार बाणखेले यांना नेहमीच मदत करण्यासाठी घरी येत असे. बाणखेले यांच्या अंगावर सोन्याचे दागिने होते. त्याच्यावर या कामगाराची नजर होती. सोमवारी दुपारी दोन वाजता अंजनाबाई बाणखेले या घरातून निघून गेल्या. मुंबईतून मुलाने फोन केला. मात्र, तो बंद लागल्याने, त्यांनी शेजाऱ्यांना शोध घेण्यास सांगितले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. त्यामुळे माजी ग्रामपंचायत सदस्य वसंतराव बाणखेले यांनी त्या हरवल्याची तक्रार मंचर पोलिसांत दिली. येथून जवळच उजवा कालवा गेल्याने तेथेही शोध घेण्यात आला. या दरम्यान संबंधित कामगाराने उसनवारीचे पैसे देण्यासाठी एका व्यक्तीला दागिने दिले होते. ही गोष्ट समजल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्या कामगाराला फोन केला असता त्याने परराज्यात असल्याचे सांगितले. उडवाउडवीची उत्तरे त्याने दिली. संशय बळावल्यानंतर कसून चौकशी केली असता, वृद्धा अंजनाबाई बाणखेले यांचा खून केल्याचे त्याने कबूल केले व घटनेची जागा सांगितली. पोलिस पथकाने शोध घेतला असता, घरापासून ३०० मीटर अंतरावर असलेल्या शेतामधील गवतात वृद्धेचा मृतदेह आढळून आला. तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील वेल चोरून नेण्यात आले होते, तसेच मातीत तोंड दाबून तिचा खून केला होता. हातातील पाटल्या काढता न आल्याने त्या तशाच राहिल्या होत्या. रुग्णवाहिकेतून मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. मंचर पोलिसांनी पंचनामा केला असून, परराज्यात गेलेल्या संशयित आरोपी कामगाराला परत आणण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.