दारूच्या नशेत झोपण्याच्या जागेवरुन ज्येष्ठाचा धारदार हत्याराने खून

By नितीश गोवंडे | Updated: November 6, 2023 18:47 IST2023-11-06T18:46:50+5:302023-11-06T18:47:13+5:30

खडकीमध्ये झोपण्याच्या वादातून एका ज्येष्ठ नागरीकाचा दारूच्या नशेत एकाने धारदार शस्त्राने वार करून खून केला

Murder of a senior citizen with a sharp weapon from his sleeping place under the influence of alcohol | दारूच्या नशेत झोपण्याच्या जागेवरुन ज्येष्ठाचा धारदार हत्याराने खून

दारूच्या नशेत झोपण्याच्या जागेवरुन ज्येष्ठाचा धारदार हत्याराने खून

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात किरकोळ कारणावरून खुनाच्या घटना घडत आहेत. खडकीमध्ये झोपण्याच्या वादातून एका ज्येष्ठ नागरीकाचा दारूच्या नशेत एकाने धारदार शस्त्राने वार करून खून केला. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला पोलिसांनी अटक देखील केली आहे. मंगेश भागाजी भद्रीके (७५, रा. खडकी रेल्वे स्थानक फुटपाथ, खडकी) असे खून झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे तर विकास रामचंद्र गायकवाड (५२, रा. खडकी बाजार, खडकी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आण्णा बादशहा गुंजाळ यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत हे खडकी रेल्वे स्टेशन येथील फुटपाथवर राहतात. शनिवारी आरोपी आणि मयत यांच्यामध्ये फुटपाथवर झोपण्याच्या जागेवरून वाद झाला. विकास गायकवाड हा दारु पिऊन आला होता, त्याने मंगेश भद्रीके यांच्या डोक्यावर, पाठीवर व हातावर धारदार हत्याराने वार केले. यामध्ये मंगेश भद्रीके हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला व आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील करत आहेत.

Web Title: Murder of a senior citizen with a sharp weapon from his sleeping place under the influence of alcohol